Chhatrapati Sambhajinagar News, 19 June : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून विजयी झालेले महायुतीचे संदिपान भुमरे सध्या सत्कार समारंभांमध्ये व्यस्त आहेत. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून तब्बल एक लाख 35 हजारांच्या मताधिक्याने विजयी होत भुमरे यांनी मराठवाड्यात महायुतीची लाज राखली.
भुमरे यांना महायुतीतील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मदत झाली. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत म्हणून महायुतीला राज्यात पाठिंबा जाहीर केला होता.
त्यानुसार संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातही मनसेचे कार्यकर्ते भुमरे यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. मनसेच्या (MNS) प्रचाराचा भुमरे यांना किती फायदा झाला हे निश्चित नसले तरी खासदार भुमरे यांनी मात्र मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेत आभार मानले.
यावेळी भुमरे यांनी राज ठाकरे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. तर खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल राज ठाकरेंनी भुमरे यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यातील आठ पैकी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून एकमेव महायुतीचे संदिपान भुमरे विजयी झाले.उर्वरित सातही लोकसभा मतदारसंघात महायुतीला सपाटून मार खावा लागला.
भुमरे यांच्या विजयामुळे मराठवाड्यात (Marathwada) महायुतीची पत राखली गेली. निवडणुकीआधी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील संबंधित मतदारसंघामध्ये प्रचारासाठी संपर्क नेत्यांची नियुक्ती केली होती. तसेच महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. संभाजीनगरात बाळा नांदगावकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.
त्यानुसार संदिपान भुमरे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रचारात सक्रिय सहभागी होण्यासंदर्भात आवाहन केले होते. भूमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून तर निवडणुकीतील विजयानंतर निघालेल्या मिरवणुकीपर्यंत मनसेचे पदाधिकारी महायुतीसोबत होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना संभाजीनगरातील क्रांती चौक येथे शिवसेना ठाकरे गटाविरुद्ध राडा झाला तेव्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
या सर्व पार्श्वभूमीवर संदिपान भुमरे यांनी खासदार झाल्यानंतर मनसेचे आभार व्यक्त करण्यासाठी थेट मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच भविष्यातही अशीच मदत कायम मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या भेटी संदर्भात मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी माहिती दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.