
Nagpur Congress news : विधानसभेची निवडणूक आणि त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीत लुडबूड करून अनेकांनी नावे कापल्याने नागपूर जिल्ह्याचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना आता पक्षातूनच फटाके लावले जात आहेत.
माजी प्रदेश सचिव आणि चंद्रपूरचे निरीक्षक मुजीब पठाण यांनी केदारांच्या विरोधात आधी आंदोलन केले, आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे तक्रार करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
मुजीब पठाण यांनी दोन दिवसांपूर्वी केदारांच्या विरोधात आंदोलन केले होते. नागपूर (Congress) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात केदारांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्यावर कडक करावाई करण्यात यावी अशी मागणी करून पठाण यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आंदोलन केले होते.
नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यकारिणीत मुजीब पठाण हे प्रदेश महामंत्री होते. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेश कार्यकारिणीतून त्यांना डच्चू देण्यात आला आहे. केदार यांनीच आपले नाव कापल्याचा आरोप पठाण यांचा आहे. विशेष म्हणजे मुजीब पठाण यांच्या बुटीबोरी परिसरातून केदारांनी डॉ. रमण चौधरी यांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. हा बदल करून पठाण यांना शह देण्यात आला आहे.
चार दिवसांपूर्वी बुटीबोरी काँग्रेसच्या एका कार्यक्रमातूनही पठाण यांना वगळण्यात आले. निमंत्रण पत्रिकेतही त्यांचे नाव टाकण्यात आले नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांनाही केदार समर्थकांनी विरोध केला होता. ते प्रभारी जिल्हाध्यक्ष होते. त्यांना सात महिन्यातच हटवण्यात आले. त्यांच्या ऐवजी केदारांचे कट्टर समर्थक असलेले आश्विन बैस या नवख्या कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून उघडउघड केदारांच्या सांगण्यावरून कार्यकारिणीत बदल केले असल्याचे दिसून येते असे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे.
बाबा आष्टनकर जिल्हा परिषद सदस्य होते. ते जिल्हा परिषदेचे गटनेते होते. असे असताना अवघ्या सात महिन्यातच त्यांना हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी आष्टनकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुळकांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांना वरिष्ठ करून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याच समर्थकांना तिकीट देण्याचा आग्रह केदारांनी धरला होता. जिल्हा काँग्रेस कमिटीतून फक्त केदार समर्थकांचेच नाव पाठवण्यात आले होते. एवढेच नव्हे तर उद्धव सेनेच्या रामटेक आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या हिंगणा विधानसभा मतदारसंघावरही केदारांनी दावा केला होता. येथील उमेदवारही जाहीर केले होते. रामटेकमध्ये मुळक यांनी निवडणूक लढवली तर हिंगणा विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या समर्थकांनी शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली होती
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.