Nanded Political News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या तीन-चार दिवसांत घोषित होण्याची शक्यता आहे. महायुती व महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटपही अंतिम टप्प्यात आले आहे. आज उद्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या जाऊ शकतात.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंत चव्हाण यांना उमेदवारी फिक्स असल्याचे बोलले जाते. वसंत चव्हाण हे माजी आमदार असून, लोकसभा लढवण्याची इच्छा त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली होती.
जागावाटपाच्या आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये वसंत चव्हाण यांच्या नावावर एकमत झाल्याचेही बोलले जाते. नांदेडची जागा काँग्रेसची असल्याने घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मदतनीसाच्या भूमिकेत असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या जागेवर काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात असताना माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे. (Loksabha Election 2024 News in Marathi)
काही दिवसांपूर्वी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे संधी देण्याची मागणी केली होती. पक्षातही त्यांच्या नावावर गांभीर्याने चर्चा होऊन चव्हाण यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रदेश काँग्रेसनेही हायकमांडकडे त्यांच्या नावाची शिफारस केल्याचे सांगितले जाते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेला नांदेडमध्ये नव्याने पक्ष बांधणी आणि लोकसभेची तयारी करावी लागली.
अगदी थोड्या वेळात महायुतीसमोर काँग्रेसचा तगडा उमेदवार देण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. इतर पक्षातून एखादा नेता फोडता येतो का? अशी चाचपणी आणि गळ घालण्याचे प्रयत्नही काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यंतरीच्या काळात केले.
यात शेकापचे लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला होता. प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रवेश सोहळ्याची तयारीही करण्यात आली होती.
परंतु, ऐनवळी आशाताई शिंदे (Ashatai Shinde) यांनी काँग्रेस प्रवेशाला नकार दिला. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा नव्याने उमेदवाराचा शोध घ्यावा लागला. माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या रूपाने तो संपणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नांदेडची जागा काँग्रेस सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणणार, असे दावे स्थानिक व राज्याच्या नेत्यांकडून केले जात आहेत. आता त्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे, हे प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नावाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. तीन वेळा आमदार राहिलेले चव्हाण सक्षम उमेदवार ठरू शकतील, असे काँग्रेस नेत्यांना वाटते.
नायगाव, देगलूर- बिलोली या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क व दबदबा आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरही वसंतराव चव्हाण काँग्रेससोबतच राहिले. त्यांना उमेदवारीच्या रूपाने काँग्रेसश्रेष्ठींकडून फळ दिले जाणाार असल्याची चर्चा आहे.
जागावाटप जाहीर होईपर्यंत एखाद्या दुसऱ्या पक्षातील नेत्याला आयात करून त्याला मैदानात उतरवण्याचे प्रयत्नही काँग्रेसकडून सुरू आहेत. तसे झाले तरच वसंत चव्हाण यांचे नाव मागे पडू शकते, पण जर मोठा मासा गळाला लागला नाही, तर मात्र वसंत चव्हाण (Vasanat Chavan) हेच नांदेड लोकसभेचे उमेदवार फिक्स असतील, अशी चर्चा आहे.
नांदेडच्या मतदारांनी काँग्रेसला कठीण परिस्थितीत अनेकदा तारले आहे. काँग्रेसची (Congress) पारंपरिक मतं आजही कायम आहेत. या शिवाय शिवसेना (Shivsena)-राष्ट्रवादी आणि सगळं काही व्यवस्थित झालं तर वंचित बहुजन आघाडीची साथही काँग्रेसला मिळू शकते.
(Edited By : Sachin Waghmare)
R