Nanded Election Results 2024 Live Update : नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांना मदत होईल, या उद्देशाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रवेश देत भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केली होती. लोकसभा निवडणुकीतील सुरुवातीचे कल पाहता भाजपचे चिखलीकर काहीसे बॅकफूटवर आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी लीड घेतली आहे.
माजी मुख्यमंत्री व भाजपचे (BJP) विद्यमान राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय निश्चित समजला जात होता. मात्र, याठिकाणी काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यावर लीड घेत महायुतीला धक्का देण्याच्या तयारी दिसत आहेत.
भाजप उमेदवार प्रताप चिखलीकर (Pratp Chikhlikar) यांना राज्यातील सत्ताबदल, शेतकऱ्याचे प्रश्न, संविधान बदलाची चर्चा, मुस्लिम आरक्षण या विषयावर महाविकास आघाडीने रान पेटवले होते. त्याचा फटका नांदेड मतदारसंघात चिखलीकर यांना बसला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे चिखलीकर यांच्या पाठीशी असताना त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशापूर्वी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. मात्र चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर या दोघांनी एकमेकांशी जुळवून घेत नांदेडची जागा मोठा मताधिक्क्याने निवडून आणण्याचा दावा केला होता. याठिकाणी अशोक चव्हाण यांची चिखलीकर यांना मदत होईल, असे चित्र होते. मात्र, या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरला, अशी चर्चा आहे.
महाविकास आघाडीच्या (MVA) वसंत चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी मंत्री व लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी नांदेडमध्ये आता वसंत ऋतू बहरणार, असे सांगत अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार असल्याचे संकेत दिले होते.
मंगळवारी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून पहिल्या फेरीत प्रताप पाटील चिखलीकर यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये या आघाडी पीछाडीचा खेळ सुरू झाला.
यात कधी चिखलीकर पुढे तर वसंत चव्हाण पिछाडीवर असे चित्र होते. नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांनी चिखलीकररांवर मोठी आघाडी घेत महायुतीला नांदेडमध्ये धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, येत्या काळात वसंत चव्हाण (Vasnat Chavan) यांची आघाडी पुढे कायम राहते का? यावर नांदेड जिल्ह्यात भाजपचे कमळ पुन्हा फुलणार की काँग्रेस बाजी मारणार? हे अवलंबून असणार आहे. त्यासोबतच अशोक चव्हाणांचा 'आदर्श' नांदेडकर धुडकावणार का? अशी चर्चा रंगली आहे.