Nanded Political News : तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून जालना-मुंबई मार्गावर धावणारी मराठवाड्यातील पहिली 'वंदे भारत' रेल्वे सुरू केली होती. दरम्यान नांदेडपर्यंत रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यामुळे आता ही रेल्वे नांदेडपर्यंत विस्तारीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रेल्वे सुरू करण्याचे श्रेय नांदेड जिल्ह्यातील भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले आहे. तर खासदार डाॅ. अजित गोपछडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड-मुंबई वंदे भारत रेल्वेसाठी आपण पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे.
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून नांदेडकरांचे (Nanded) एक स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंह बिट्टू यांचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 11 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीच्या निमित्ताने ही नांदेडकरांसाठी एक विशेष भेट म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेससाठी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे मी विशेष आभार मानतो. ही गाडी सुरु करण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच द्यावे लागेल.
त्यांनीच 2023 मध्ये नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा केली होती. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळातच ही गाडी मुंबईहून जालनापर्यंत सुरू झाली. जालना ते नांदेड दरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर ही गाडी नांदेडपर्यंत धावणार असल्याचे पूर्वनियोजित होते. त्यानुसार, रेल्वे बोर्डाने नांदेड-मुंबई-नांदेड प्रवासाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. मी रावसाहेबजी दानवे यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे (Ashok Chavan) चव्हाण म्हणाले.
चिखलीकर म्हणतात, पाठपुराव्याला यश
मुंबई ते जालना धावणारी वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून सुरू व्हावी यासाठी मी नांदेडचा खासदार असताना मागणीपूर्वक प्रयत्न केले होते. अखेर या प्रयत्नाला यश आले असून आता लवकरच वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून मुंबईसाठी धावणार आहे. गृहमंत् अमितभाई शहा हे नांदेड भेटीवर आले असता त्यांच्याकडेही मागणी केली होती आणि विराट सभेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावाचा उल्लेख करत अमित शहा यांनी नांदेड येथून विमानसेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या अनुषंगाने मी पाठपुरावा केला होता.
अखेर या पाठपुराव्याला यश आले असून आता लवकरच नांदेड येथून वंदे भारत एक्सप्रेस मुंबईसाठी सुरू होणार आहे . या रेल्वेमुळे नांदेडच्या विकासाला नवी गती प्राप्त होईल आणि नांदेडकरांना जलद गतीचा प्रवास करून मुंबईला लवकर पोहोचता येईल. वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे मी आभार, मानतो असे प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.
तारांकित प्रश्न, रेल्वे बोर्डाशी समन्वय..
नांदेड ते मुंबई रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर व्हावा, तसेच मराठवाड्यातील प्रवाशांना प्रगत सुविधा मिळाव्यात, यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मागील वर्षभरापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यास मंजुरी दिली असून याबाबतचे अधिकृत पत्र आज जारी करण्यात आले आहे.
खासदार गोपछडे यांनी या विषयावर राज्यसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर प्रवासी मागणी, तांत्रिक अडचणी, कार्यक्षम वेळापत्रक आणि इतर आवश्यक बाबींसंदर्भात रेल्वे बोर्डाशी समन्वय साधून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ही सेवा फक्त नांदेडसाठीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे,असेही गोपछडे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.