
राज ठाकरे नेहमी भूमिका बदलतात, अशी टीका त्यांच्यावर सतत होते. ती टीका खरी आहे, हे आज पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. सुरुवातीचा अंतर्गत विरोध वगळता दोन्ही पक्षांकडून त्यासाठी सकारात्मक हालचालीही सुरू होत्या. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताज लँड हॉटेलात गुप्त बैठक झाल्याचे समोर आले. ही बैठक कशासाठी होती, हे निश्चितपणे सांगता येणार नसले तरी यामुळे राज ठाकरे यांच्या विश्वासार्हतेला पुन्हा एकदा तडा गेला, हे मात्र निश्चित.
मुंबईत दोन दिवसांपूर्वी रेल्वे अपघात झाला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती होणार, अशा बातम्या दाखवण्यात जितका वेळ घालवला, तितका वेळ माध्यमांनी लोकांच्या समस्या दाखवण्यात घालवायला हवा होता, असे राज त्यावेळी म्हणाले होते, भावासोबत जाण्याबाबत त्यांनी एक प्रकारचा रूक्षपणा दाखवला होता. त्यानंतर फडणवीस आणि राज यांची भेट झाल्याचे आज समोर आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भुवया उंचावण्याची खरेतर गरज नाही, कारण सध्यातरी राज्याच्या राजकीय पटलावर मुख्यमंत्री फडणवीस हेच 'रिंगमास्टर' आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण मुंबईत मराठी मतांच्या भोवतीच फिरते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला, मात्र विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. आता मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकात शिवसेना आणि भाजपमध्ये बोटावर मोजण्याइतके अंतर होते. आता उद्धव ठाकरे यांची तशी ताकद राहिलेली नाही. उद्धव यांचा प्रभाव वाढला म्हणूनच राज यांनी शिवसेना सोडली होती. ते राज आता युती करून उद्धव यांना शक्ती देतील का, ही विचार करण्यासारखी गौष्ट आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. माध्यमांत या चर्चेची चलती आहे. दोघे भाऊ एकत्र येणार किंवा यावेत, यासाठी यापूर्वीही प्रयत्न झालेले आहेत. मात्र त्यावेळी शिवसेना अविभाजित होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून अशा चर्चांना फारसा प्रतिसाद मिळत नसे. आता मात्र मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी असे म्हणत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील पहिल्या फळीचे नेते राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी सकारात्मक दिसत आहेत.
ही चर्चा सुरू झाली त्यावेळी संदीप देशपांडे, अमेय खोपकर या मनसेच्या नेत्यांनी विरोधी सूर आळवला होता. या दोघांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. या घडामोडी खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपणार असेल तर ते राज ठाकरे यांना नको आहे का? याचे उत्तर काय असू शकते, हे सांगण्याची गरज नाही. या राजकीय घडामोडीत सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती मुख्यमंत्री फडणवीस यांची. फडणवीस आणि राज यांची भेट झाल्याची बातमी समोर आली आणि राज यांच्या विश्वासार्हतेला पुन्हा एकदा टाचणी लागली.
या दोघांची भेट कशासाठी झाली, मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच झाली का, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. एक मात्र नक्की की या भेटीचे 'टायमिंग' अत्यंत महत्वाचे आहे. राज - उद्धव एकत्र येण्याची प्रक्रिया अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे, अशी चर्चा सुरू होती. त्या चर्चेतील हवा या भेटीने काढून घेतली आहे. विरोधकांनी फक्त मैदानावर उपस्थिती लावायची आहे. कसे खेळायचे हे मुख्यमंत्री फडणवीसच ठरवत आहेत. फडणवीस यांना हवे असेल तरच राज-उद्धव एकत्र येतील, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
उद्धव यांच्याशी युती करायची नसती तर राज यांनी तसे आधीच जाहीर केले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही. दोन्ही डगरींवर हात ठेवून, उद्धव यांच्याशी युती करण्याची भूमिका मी कधी घेतली, असे म्हणायला ते यावेळीही मोकळे झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते, मात्र त्याचे मतांत रूपांतर होत नाही, असे शरद पवार अलीकडेच म्हणाले आहे. त्यामुळे राज यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबतची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती. या पार्श्वभूमीवरही फडणवीस - राज यांच्या भेटीची माहिती बाहेर येण्याला महत्व प्राप्त झाले आहे.
महायुतीतील दोन्ही मित्रपक्ष जास्त हालचाल करणार नाहीत, याची योग्य काळजी फडणवीस यांनी घेतली आहे. सध्या एकनाथ शिंदे हे पूर्णपणे बाजूला पडलेले आहेत. शिंदे यांच्या तुलनेत अजितदादा पवार यांची परिस्थिती चांगली, असे म्हणता येईल. उद्योगमंत्री उदय सामंत बंड करणार, काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार आणि उपमुख्यमंत्री होणार, अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. ती पुन्हा केव्हाही सुरू होऊ शकते, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांनी जास्त गडबड केली तर राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात, हे समजून घेतले पाहिजे.
राज्यात विरोधक कमकुवत झाले आहेत. काँग्रेस मोडकळीस आलेली आहे. प्रदेशाध्यक्षांसह काही नेते बोलतात, मात्र संघटनात्मक पातळीवर पक्ष खिळखिळा झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीही अशीच गत झालेली आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचे राज्यभरात जाळे आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना सत्तेशी जवळकीची घाई झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे विरोधकच उरलेले नाहीत. अशा परिस्थितीत उद्धव -राज यांनी एकत्र यावे, असे काही लोकांना वाटणे साहजिक आहे. फडणवीस यांना असे निश्चितपणे वाटणार नाही.
विरोधक कमकुवत असताना राज आणि उद्धव एकत्र यावेत, हे फडणवीस यांना नक्कीच आवडणार नाही, ही झाली एक बाजू. दोघे भाऊ एकत्र येताहेत, हे दाखवून महायुतीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढवून घ्यायची, ही दुसरी बाजू. उदय सामंतांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे आणि छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांचे नियंत्रण फडणवीस यांच्या हाती आलेले आहे. असे म्हणतात की राज ठाकरे यांचेही हात अडकलेले आहेत. फडणवीस यांच्याशी भेटीनंतर हे अधोरेखित झाले आहेत. सतत भूमिका बदलणारा नेता, या राज यांच्या प्रतिमेवर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.