

Shivsena Poilitics News : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महत्वाची घडामोड घडली. शेतकरी नेते आणि माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या हातून धनुष्यबाण स्वीकारला. लोहा येथील शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वला धक्का देण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न असल्याची चर्चा होत आहे. धोंडगे यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न एकनाथ शिंदे हेच सोडवू शकतात, असे सांगत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपाच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला एकप्रकारे आव्हान दिले आहे.
नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीत राज्यात महायुती असली तरी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये भाजपाने शिवसेनेला कचपटा समान वागणूक दिली. महापालिका निवडणुकीत तर युतीसाठी याचना करूनही चव्हाण यांनी शेवटपर्यंत शिवसेनेला सोबत घेणे टाळले. शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना सोबत घेतले, पण तेही स्वतःच्या सोयीसाठी असे बोलले जाते. दुसरीकडे शिवसेनेचे जिल्ह्यातील हेमंत पाटील, बोंढारकर, बाबुराव कदम या आमदारांनी मात्र अशोक चव्हाण यांना असलेला आपला विरोध कायम ठवेला.
अशोक चव्हाण यांच्या खेळीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेतच फूट पडल्याचे चित्र या निमित्ताने दिसले. मोठी ताकद असूनही शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेतून बाहेर ठेवण्यात आले. भविष्यातील धोका ओळखत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शेतकरी संघटनेची मोठी ताकद पाठीशी असलेल्या, मात्र सध्या दुर्लक्षित ठरलेल्या माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांना गळ घातली. एकनाथ शिंदे यांच्या मुंबई भेटीत या दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर धोंडगे यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला होता.
त्यानूसार लोहा येथील शेतकरी अधिवेशनातून हा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाला. कायदे शेतकऱ्यांसाठी असतात, शेतकरी कायद्यांसाठी नसतो. काहींनी बळीराजाचा वापर करून त्याचाच बळी घेतला, पण आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय घेतले असल्याचे सांगत शिंदे यांनीही धोंडगे आणि त्यांच्यासोबत पक्षात आलेल्या त्यांच्या समर्थकांना, शेतकऱ्याला आपण वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास दिला.
मुख्यमंत्री असताना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत चार सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. बंद पडलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला. राज्यातील 4,29 लाख कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देत 32.45 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले. मराठवाड्यावरचा 'दुष्काळवाडा'हा शिक्का पुसून टाकण्याचा निर्धार शिंदे यांनी बोलून दाखवला.
दसऱ्याच्या वेळी कार्यकर्त्यांना मुंबईत न बोलावता थेट शेतकऱ्यांच्या मदतीला पाठवले आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी जोडधंदे उपलब्ध करून देणे, शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
शंकरअण्णा धोंडगे फक्त नांदेडच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. प्रत्येक गावात शेतकरी संघटना उभारून शेतकऱ्यांच्या समस्या थेट सोडवू, असा शब्द देत शिंदे यांनी नांदेडमध्ये नवा डाव टाकल्याची चर्चा या शेतकरी मेळाव्यानंतर होऊ लागली आहे. धोंडगे यांचे शेतकऱ्यांचे संघटन मोठे आहे, ही ताकद शिवसेनेला संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मदत तर करेलच, पण भाजपाच्या एकहाती वर्चस्वाला धक्का देण्याचे कामही करेल, असा दावा केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.