Nanded News : नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व अशोक चव्हाण यांनी सुमारे चार दशके केले, तर लातूर जिल्ह्याचे नेतृत्व दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी केले. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची तशीच विकासकामांबाबत स्पार्धा होती. मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या विकासाला चालना दिली, तर दुसरीकडे लातूरच्या विकासासाठी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी. या चढाओढीत लातूर व नांदेड या दोन जिल्ह्यांत दुरावा निर्माण झाला होता. (Nanded Vs Latur Politics)
सध्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे काँग्रेसमध्ये राहिले नाहीत, तर विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे नांदेडची जबाबदारी अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी घेतली, तर या दोन्ही जिल्ह्यातील दुरावा दूर होऊन काँग्रेसला बळ मिळू शकते.
मराठवाड्यात काँग्रेसचे बलस्थान असलेले जिल्हे म्हणजे लातूर व नांदेड. या दोन्ही जिल्ह्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे साहजिकच या दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेसमधील नेत्यांचे पक्षांत वर्चस्वासाठी कुरघोडीचे राजकारण झाले. लातूरच्या विकासासाठी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लातूर शहरात शासनाच्या विविध विभागांचे उपविभागीय कार्यालय लातूरमध्ये खेचून आणले. यात कृषी, बांधकाम, शिक्षण, आरोग्य आदी विभागांचा समावेश होता, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये विविध विभागांचे कार्यालय आणण्यसाठी प्रयत्न केले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचे विभाजन करून स्वतंत्र लातूरला हे आयुक्त कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न विलासराव देशमुख यांनी केला होता, तर अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नांदेडला सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा आणखी वाढत गेला.
नांदेड व लातूर या दोन्ही जिल्ह्यांत काँग्रेसचे बऱ्यापैकी संघटन आहे. काही काळाचा अपवाद वगळता या दोन्ही जिल्ह्यांत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या दहा वर्षांत या दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. मराठवाड्याचे नेतृत्व येणाऱ्या काळात अमित देशमुख यांच्याकडे पर्यायाने लातूरकडे येणार आहे, तर नांदेडला काँग्रेसकडे सक्षम नेता नाही. त्यामुळे लातूरकरांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत नांदेडला सोबत घेऊन चालावे लागणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील दुरावा कमी होणे हे पक्षाच्या हिताचे आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.