

MNS Reaction on Defection of Shivsena UBT MP: पक्षाची विचारधारा समजून न घेता केवळ चिन्ह आणि तिकीटावर मतं घेतल्यानंतर पक्षांतर करणे हा मतदारांचा अपमान असल्याचे स्पष्ट मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात नारायण राणे, छगन भुजबळ शिवसेनेतून फुटून बाहेर पडले तेव्हा त्यांना लपून बसावे लागले होते. मात्र, तेव्हाचा दरारा आता राहिला नाही, असेही नांदगावर म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथे मनसेच्या नवसंकल्प मेळाव्यासाठी नांदगावकर आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फुटल्याच्या मुद्यावर बोलते केले. यावर मत व्यक्त करताना बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेला आमदार खासदार फुटला तर त्याला भर रस्त्यात चपलेने तुडवा, महिलांनी तर अगदी शेण वगैरे मारले तरी चालेल, असा आदेशच दिला होता.
नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारखे नेते जेव्हा शिवसेनेतून फुटले तेव्हा त्यांना अनेक दिवस लपून बसावे लागले होते. शिवसैनिकांचा तेवढा दरारा तेव्हा होता. तो आताच्या काळात राहिला नाही. एका पक्षाकडून निवडून आल्यानंतर पक्षांतर करणे हा त्या मतदारांचा अपमान ठरतो, असे नांदगावकर म्हणाले. सत्ताधाऱ्यांना स्थानिक पक्ष, संघटनाच ठेवायच्या नाहीत. त्या त्यांना विकलांग करायच्या आहेत. पण, ही पद्धत भविष्यासाठी घातक ठरणार आहे.
पक्षांतरबंदी कायदा असूनही त्यातून पळवाटा काढत फोडाफोडी केली जात आहे. जाणारी भेटत आहेत, म्हणून पक्ष फोडले जात आहे. मात्र, पक्षाची विचारधारा समजून न घेता केवळ चिन्ह आणि तिकीटावर मतं घेतल्यानंतर पक्षांतर करणे हा मतदारांचा अपमान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात फुटला तर रस्त्यावर तुडवा, असे ते सांगायचे. त्यामुळे त्यांच्या काळात कुणी हिंमत केली नाही. छगन भुजबळ, राणे फुटले. तेव्हा ते दोन महिने लपून बसले होते, असा त्यावेळी दरारा होता.
पक्षफुटीच्या प्रकारामुळे लोकांचा पक्षांतील नेत्यांवरील आणि ईव्हीएमवरचाही विश्वास कमी होत चालला आहे. त्यामुळेच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी नांदगावकर यांनी पुन्हा केली. याआधीच्या निवडणुकांत पक्षाने कुणाला पाठिंबा दिला होता, तर कुणासाठी माघार घेतली होती. मात्र, आता यापुढील प्रत्येक निवडणुकीत मनसे उतरेल, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.