NCP-Shivsena News : हिंगोली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मराठवाड्यातील हिंगोलीचे माजी काँग्रेस आमदार भाऊसाहेब पाटील गोरेगावकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेश निश्चित झालेला असताना त्यांना राष्ट्रवादीत खेचण्यासाठी अजित पवार यांनी गोरेगावकर यांचे भाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यामार्फत प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकताच परभणी हिंगोली दौरा केला. या दौऱ्यातच काँग्रेसचे माजी आमदार गोरेगावकर यांना राष्ट्रवादीत आणण्याची रणनीती ठरली. त्यानुसार थेट अजित पवारांनी गोरेगावकर यांची भेट न घेता त्यांचे भाचे असलेल्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. त्यानुसार नुकतीच गोरेगावकर- बाबासाहेब पाटील या मामा भाच्यांची आणि आमदार विक्रम काळे यांची हिंगोलीत त्यांच्या निवासस्थानी बंद दाराअड तब्बल दीड तास चर्चा झाली.
या चर्चेनंतर भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाचा निर्णय बदलणार की ते ठाम राहणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (NCP) याआधी नांदेड जिल्ह्यात अजित पवार यांनी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांना राष्ट्रवादीत आणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दणका दिला होता. आभार दौऱ्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये आलेल्या एकनाथ शिंदे यांनी भास्कर पाटील खतगावकर यांना शिवसेना प्रवेशाचे निमंत्रण दिले होते.
यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी खतगावकर यांच्या निवासस्थानी शिंदे आणि खतगावकर यांच्यात चहापान आणि स्नेह भोजनही होणार होते. मात्र ऐनवेळी हे चहापान आणि स्नेहभोजन टळले. खतगावकरांची भेट न घेताच एकनाथ शिंदे नांदेड मधून निघून गेले. त्यानंतर महिनाभरातच भास्कर पाटील खतगावकर यांनी आपली सून मीनल खतगावकर व जिल्ह्यातील आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवारांनी एकाच वेळी नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झटका दिल्याची चर्चा या प्रवेशानंतर सुरू झाली होती.
नांदेड नंतर अजित पवार यांनी आपले लक्ष परभणी आणि त्या शेजारच्या हिंगोली जिल्ह्यावर केंद्रित केले आहे. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर हिंगोलीत पक्षाला मोठी बळकटी मिळेल. याचा फायदा निश्चितच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, हे गणित लक्षात घेऊन अजित पवारांनी गोरेगावकर यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
बंद दाराआड झालेल्या या बैठकीनंतर गोरेगावकर यांनी स्पष्टीकरण देत आपला निर्णय झाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित असल्याचे म्हटले आहे. विक्रम काळे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत झालेली भेट ही कौटुंबिक होती, असेही गोरेगावकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं दडलंय काय? हे लवकरच बाहेर येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.