Majalgaon News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) चिंतन शिबीरात प्रकाश सोळंके यांच्या कार्याध्यक्षपदामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्याने कार्याध्यक्षपदाचा विषय दिवसभर चर्चेत राहिला. पण यातच सोळंके यांच्या माजलगाव येथील रत्नसुंदर मेमोरियल रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी केलेल्या तपासणीत त्रुटी आढळून आल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी परवाना रद्द करण्याबाबतचे आदेश काढले. मात्र, या कारवाईची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली झाली आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव विकास प्रतिष्ठान अंतर्गत रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची उभारणी होत आहे. रुग्णालय सुरु होण्याअगोदरच जिल्हा रुग्णालयाचा बॉम्बे नर्सिग होमचा परवाना काढला असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे दाखल झाली होती.
याची दखल घेत शल्यचिकित्सकांच्या आदेशावरून माजलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी तपासणी केली. तपासणी अहवालात अनेक त्रुटी आढळून आल्याचे कारण देत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे यांनी शुक्रवारी या रुग्णालयाचा बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द करत रुग्णालय कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश काढले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजलगाव मतदारसंघाच्या राजकारणात 20 वर्षापासून आमदारकी भूषवत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी वर्चस्व निर्माण केलेले आहे. 2009 मंत्रिमंडळात त्यांची महसूल व पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून वर्णीही लागली होती. मंत्रिपदाच्या काळात त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे उभारल्यानंतरही 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. परंतु त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला.
2019 च्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी न लागल्याने ते पक्षावर प्रचंड नाराज झाले होते. याच रागात त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे ठरवले. त्यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व दस्तुरखुद अजित पवारांनी आमदार सोळंकेंची समजूत काढत प्रदेश कार्याध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता, परंतु तो पाळला गेला नाही.
नुकतेच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकाश सोळंके यांच्या कार्याध्यक्षपदावरून शरद पवार गटाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांना चिमटा काढला. एकेकाळी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष मिळणार असलेल्या प्रकाश सोळंके यांच्या रुग्णालयाचा परवाना रद्द झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.