NCP News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच धक्का दिला आहे. विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. 1990 मध्ये कैलास पाटील हे शिवसेनेकडून गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यानंतर जेव्हा पक्षाचा विस्तार मराठवाड्यात सुरू केला तेव्हा छत्रपती संभाजीनगरपासून याची सुरूवात झाली. 1988 मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) साठ पैकी 28 नगरसेवक निवडून आणत जोरदार एन्ट्री केली होती. शहरात यश मिळाल्यानंतर ग्रामीण भागातही शिवसेनेचे जाळे झपाट्याने पसरले. 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अगदी गरीब, सामान्य कुटुंबातील शिवसैनिकांना उमेदवारी दिली.
त्यापैकीच एक असलेल्या कैलास पाटील यांना गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून काँग्रेसच्या साहेबराव पाटील डोणगावंकर यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते. शिवसेनेची तेव्हा एवढी प्रचंड हवा होती की, त्या काँग्रेसच्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या साहेबराव पाटील डोणगांवकर यांचा पराभव झाला होता. (Eknath Shinde) परंतू पुढे हेच कैलास पाटील छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर 1991 मध्ये 18 आमदार फोडत शिवसेनेत बंड पुकारले तेव्हा त्यांच्यासोबत गेले होते. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत या बंडाची किमंत त्यांना चुकवावी लागली. काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या कैलास पाटील यांचा अपक्ष अशोक पाटील डोणगावंकर यांनी पराभव केला. या निवडणुकीत कैलास पाटील तिसर्या क्रमांकावर होते.
आता पुन्हा तीस वर्षांनी कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर कैलास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. अजित पवार यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. परंतु 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने एक प्रयोग केला. भाजपाचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना शरद पवारांच्या पक्षात पाठवून लढवले होते. मात्र बंब यांच्यासमोर त्यांचा टीकाव लागू शकला नाही. या निवडणुकीत कैलास पाटील यांनी पक्षाचे काम केले नाही, असा त्यांच्यावर आरोप झाला.
परिणामी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा अजित पवारांकडे आलेल्या आमदार सतीश चव्हाण यांना कैलास पाटील यांच्याकडे असलेले जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. तर पाटील यांना पदोन्नती देत प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अर्थात पाटील यांच्यासाठी हे प्रमोशन नव्हते तर त्यांना जिल्ह्याच्या संघटनात्मक जबाबदारीतून दूर करण्यात आले होते. तेव्हापासून पक्षात नाराज असलेल्या कैलास पाटील यांच्याकडून नव्या पर्यायाचा शोध सुरू होता. तो शिवसेनेच्या रुपाने थांबला आहे.
कैलास पाटील यांचे गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात पुर्वीसारखे राजकीय वजन आता राहिलेले नाही. तरीही शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यांना पक्षात आणण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. कैलास पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद वाढलेल्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात एकनाथ शिंदे पुन्हा जम बसवू पाहत आहेत. त्यात त्यांना कितपत यश येते? राष्ट्रवादी, भाजपाला याचा काही फटका बसतो का? हे आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.