
योगेश पायघन
Shivsena News : महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने स्वबळ आजमावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यांमध्ये खिंडीत कसे गाठता येईल? यासाठी रणनीती आखली जात आहे. राज्य पातळीवर महायुतीचे नेते आम्ही एकत्र लढणार असे जरी सांगत असले, तरी प्रत्यक्षात तयारी मात्र स्वबळाची सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आता मैदानात उतरून सुत्रे आपल्या हाती घेतल्याचे चित्र आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यानंतर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात शिवसेना (Shivsena) झपाट्याने वाढली. संभाजीनगर आणि मराठवाड्याने शिवसेनेला कायम भरभरून दिले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सहा आमदार आणि लोकसभेला एक खासदार या पक्षाला मिळाला. आगामी महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.
आजचा त्यांचा संभाजीनगरचा दौरा सर्वार्थाने महत्वाचा ठरणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळूनही पक्षात वाढलेली अंतर्गत गटबाजी, नेत्यांमधील दुरावा आणि संघटनेचे विस्कटलेली घडी व्यवस्थीत करण्याचे शिवधनुष्य आता शिंदेनाच पेलावे लागणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज शहरातील विकासकामांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, त्यानंतर तब्बल चार तास ते पक्ष संघटनेचे विषय मार्गी लावणार आहेत.
माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचा पक्षप्रवेश आणि त्या अनुषंगाने शिंदे पदाधिकारी मेळाव्यात संवाद साधणार आहेत. महायुतीमध्ये राज्यपातळीवर शिंदे यांच्या शिवसेनेची होत असलेली कोंडी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाची घडी विस्कळित झालेली असताना शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप राज्यात बहुतांश ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा तयारीत आहे. त्या दृष्टीने भाजप कामालाही लागले आहे.
मध्यंतरी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा आयुक्तांना फोन करून शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेऊन सूचनाही केल्या, असे असताना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाची संघटना पूर्णतः विस्कळित झाल्याचे चित्र आहे. पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल आणि खासदार संदीपान भुमरे असे सरळ तीन गट पक्षात झाले असून त्यात शहरातील पक्ष संघटन गोठल्यासारखे झाले आहे.
त्यातच जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ मागील काही महिन्यांपासून अलगद बाजूला झाले आहेत, अशा स्थितीत स्वबळाची तयारी चालवलेल्या भाजपला कसे तोंड द्यायचे, हा शिवसेनेसमोर प्रश्न आहे. पक्षातील धुसफूस उघड होत असतानाच गेल्या महिन्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरात आले होते. येथे त्यांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. इतकेच नव्हे, तर अनेकांशी स्वतंत्रपणे बोलून त्यांनी मिळवलेली माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकली. त्यामुळे शहरातील शिवसेनेबाबत आणि अंतर्गत घडामोडींबाबत शिंदे यांना इत्थंभूत माहिती आहे.
मनपा राखण्याचे आव्हान
छत्रपती संभाजीनगर मनपा शिवसेना आणि भाजप यांच्याच ताब्यात राहिलेली आहे. त्यात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप धाकटा भाऊ होता. पण, आता धाकट्या भावाने सवता सुभा करण्याचा निर्णय घेतल्याने तिन्ही दिशांना तोंडे असणार्या नेत्यांची मोट बांधून निवडणुका लढवणे आणि मनपा राखणे हे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे. याशिवाय शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी तब्बल अडीच तास वेळ दिला आहे. सायंकाळी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या पक्षप्रवेशानिमित्त आयोजित सभेतही ते भाषण करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.