

संभाजीनगरकरांसाठी आणि मराठवाड्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे ते संभाजीनगर हा प्रवास लवकरच सोपा आणि जलद होणार आहे. सध्या पुण्याहून संभाजीनगरला जाण्यासाठी 6 ते 7 तासांचा वेळ लागतो. मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलेल्या नव्या योजनेमुळे हा प्रवास फक्त दीड ते 2 तासांत पूर्ण होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
नितीन गडकरी यांनी पुणे-नागपूर नव्या महामार्गाच्या मास्टरप्लॅनची माहिती दिली आहे. या योजनेनुसार पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान एक अत्याधुनिक एक्सप्रेस वे तयार केला जाणार आहे. हा महामार्ग थेट मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून संभाजीनगर फक्त दोन तासांत पोहोचणे शक्य होईल. त्यानंतर संभाजीनगरहून नागपूरपर्यंतचा प्रवास समृद्धी महामार्गावरून साडेतीन तासांच्या आत पूर्ण होऊ शकतो. अशा प्रकारे संपूर्ण पुणे ते संभाजीनगर आणि संभाजीनगर ते नागपूर प्रवास पाच ते सहा तासांत पूर्ण होणार आहे.
पुणे-छत्रपती संभाजीनगर हा प्रस्तावित महामार्ग समृद्धी महामार्गासारखाच आधुनिक आणि वेगवान असणार आहे. या एक्सप्रेस वेची एकूण किंमत सुमारे 16 हजार 318 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर असा असणार आहे. या टप्प्यात रस्त्याची दुरुस्ती, नवीन उड्डाणपूल आणि आवश्यक सुविधा उभारण्यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या महामार्गामुळे पुणे ते संभाजीनगर दोन तासांत आणि संभाजीनगर ते नागपूर अडीच ते तीन तासांत पोहोचणे शक्य होईल.
याशिवाय पुण्याजवळील शिक्रापूर येथून अहिल्यानगरच्या बाहेरून बीड जिल्ह्यातून जाणारा एक नवीन मार्गही तयार करण्यात येणार आहे. या मार्गावरील बहुतांश काम पूर्ण झाले असून सध्या फक्त टोलचे काम शिल्लक आहे. त्यामुळे पुण्याहून बीडला जाणेही भविष्यात अधिक सोपे आणि जलद होणार आहे.
गडकरी यांनी पुणे जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचीही माहिती दिली. एकूणच पुणे जिल्ह्यासाठी जवळपास 50 हजार कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे संभाजीनगर, मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.