Chhatrapati Sambhjainagar : राज्याचे रोजगार हमी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या पैठण बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भुमरे अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. गेली कित्येक वर्ष पैठण तालुक्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भुमरे यांचे वर्चस्व राहिलेले आहे.
शिवसेनेत (Shivsena) असतांना विविध कार्यकारी सोसायट्या, बाजार समित्यांमध्ये भुमरे यांची सत्ता कायम होती. आता राज्यातील सत्तांतर आणि भुमरे यांनी केलेले बंड या पार्श्वभूमीवर (Paithan) पैठण बाजार समितीवर सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. तर दुसरीकडे बंडामुळे सहानुभूती गमावलेल्या संदीपान भुमरे यांना घेरण्यासाठी तालुक्यातील ठाकरे गट, राष्ट्रवादी व काॅंग्रेस यांची आघाडी सज्ज झाली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २० एप्रिल असल्यामुळे अद्याप (Mahavikas Aghadi) आघाडी किंवा युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल पटेल, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्यासह ठाकरे गटाचे स्थानिक व जिल्ह्यातील नेत्यांनी देखील या बाजार समिती निवडणुकीत लक्ष घातले आहे.
तालुक्यातील जवळपास सर्वच सोसायट्या व संस्था भुमरेंच्या ताब्यात असल्याने बाजार समितीतील सत्ता ते कायम राखतील असे बोलले जाते. परंतु भुमरेंना दणका देत बाजार समितीत शिरकाव करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी सुरू केला आहे. त्यामुळे यापुर्वी एकतर्फी होणारी बाजार समितीची निवडणूक यंदा मात्र चुरशीची होणार आहे.
भुमरे यांनी देखील गाफील न राहता स्वतः या निवडणुकीत लक्ष घालत कुठल्याही परिस्थिती बाजार समितीची सत्ता जाता कामा नये यासाठी शक्तीपणाला लावली आहे. कारण समितीमधील सत्ता गेली तर त्यातून मतदारांमध्ये वेगळा संदेश जाईल आणि त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल, अशी भिती भुमरे समर्थकांना आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीत दोन्ही बाजूंनी जोरदार रस्सीखेच होतांना दिसत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.