पंकजा मुंडेंनी बीडमधील ओबीसी व्यासपीठावर छगन भुजबळांबरोबर हजेरी लावणं दुसऱ्यांदा टाळल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
याआधीही जालन्यातील कार्यक्रमात त्यांनी भुजबळांसोबत मंच वाटला नव्हता.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मतदारांमध्ये या घटनाक्रमाचा राजकीय अर्थ लावला जात आहे.
Marathwada Political News : मराठा आरक्षण लागू करण्यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनानंतर महायुती सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. गॅझेटमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप आणि ओबीसींच्या सवलती या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. याच निर्णयाविरोधात काल बीडमध्ये ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार सभा पार पडली.
मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या देखील सभेला उपस्थित राहणार अशा चर्चा होत्या. पण त्या सभेला आल्याच नाही. गेल्या वर्षी जालना येथील ओबीसींच्या एल्गार सभेलाही पंकजा मुंडे गैरहजर राहिल्या होत्या. आधी जालना अन् आता बीडमध्येही पंकजा मुंडे यांनी दुसऱ्यांदा भुजबळ आणि ओबीसींच व्यासपीठ टाळल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा विजय म्हणून हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाकडे बघितले जाते. परंतु याच निर्णयाच्या जीआर वरून मराठा (Maratha) समाजामध्येच मतभेद आहेत. अनेक अभ्यासक आणि मराठा समाजातील नेत्यांनी हा जीआर फसवा असल्याचा आरोप करत सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून राज्यातील ओबीसी समाज संतप्त झाला आहे. विशेषत: ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व इतरांनी सरकारच्या गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. बीडमध्ये आधी रद्द झालेली ओबीसींची महाएल्गार सभा काल पार पडली. या सभेच्या माध्यमातून धनंजय मुंडे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर या सगळ्याच नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्रमकपणे टीका केली.
मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध नसल्याचे सांगतानाच आमच्या ताटातून मात्र कुणालाही देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महाएल्गार सभेतून ओबीसी नेत्यांनी मांडली. राज्यातील ओबीसी नेत्यांचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांच्या बरोबरीने पंकजा मुंडे यांचे नाव घेतले जाते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात ओबीसी समाजाची मोट बांधत वोट बँक भक्कम केली होती.
ओबीसी समाज हा कायम भाजपाच्या पाठीशी राहिला. ओबीसी हाच भाजपचा डीएनए असल्याचे राज्यातील नेते जाहीर सभांमधून सांगतात. मात्र आज हाच ओबीसी समाज आमच्यावर अन्याय झाला, आमचे आरक्षण धोक्यात आले असे म्हणत सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीतून आंदोलनाला सुरुवात केली. त्याला विरोध म्हणून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठवाड्यातील जालन्यातून महाएल्गार पुकारला होता.
या सभेत व्यासपीठावर छगन भुजबळ यांच्यासोबत पंकजा मुंडे यांचे नाव आणि बॅनर वर फोटो देखील छापण्यात आले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी या महाएल्गार सभेकडे पाठ फिरवली. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी काल दुसऱ्यांदा छगन भुजबळ आणि ओबीसी समाजाचे व्यासपीठ टाळल्याची चर्चा त्यांच्या गैरहजेरीनंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दसरा मेळाव्याच्या भगवान भक्ती गडावरील भाषणात पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण विषयावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती.
सरकारमध्ये असतांना विरोध कसा?
मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु ओबीसीच्या ताटातलं कुणाला देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. बीड मधील कालच्या महाएल्गार सभेला पंकजा मुंडे येणार अशी चर्चा होती. परंतु पंकजा मुंडे या सभेला आल्याच नाही. त्यांच्या या गैरहजेरीमागे त्यांचे मंत्रिपद हे मोठे कारण असल्याचे बोलले जाते. महायुती सरकारमध्ये मंत्री असताना सरकारनेच घेतलेल्या एखाद्या निर्णयाच्या विरोधात होत असलेल्या सभेत जाऊन भाषण करणे किंवा भूमिका मांडणे योग्य नाही.
कॅबिनेटमध्ये आपण आपली भूमिका वेळोवेळी मांडत आलो आहोत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान महाएल्गार सभेत ओबीसी नेत्यांनी केलेली भाषण आपण ऐकली नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. मराठा आरक्षणावर आपण आपली भूमिका अनेकदा मांडली आहे, त्यामुळे यावर आता अधिक बोलणे उचित होणार नाही असे सांगत पंकजा मुंडे यांनी ओबीसींच्या महालगार सभेच्या वादापासून स्वतःला दूर ठेवणेच पसंत केले. दरम्यान, राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी काल पंकजा मुंडे काल त्यांच्या निवासस्थानीही गेल्या होत्या.
2024 मध्ये राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टोकाला गेलेला होता. याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा फटका पंकजा मुंडे यांना बीडमध्ये बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला आणि महायुतीची हमखास निवडून येणारी बीडची जागा भाजपाने गमावली. तेव्हापासून मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वादामध्ये उघडपणे फारशी भूमिका घ्यायची नाही, असेच पंकजा मुंडे यांचे धोरण राहिले आहे.
1. पंकजा मुंडेंनी छगन भुजबळांचं व्यासपीठ का टाळलं?
→ अधिकृत कारण स्पष्ट नाही, मात्र दोघांमधील राजकीय मतभेदांमुळे त्यांनी उपस्थिती टाळल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
2. हा प्रकार किती वेळा घडला आहे?
→ हा दुसरा प्रसंग आहे; याआधी जालन्यातील ओबीसी कार्यक्रमातही पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या होत्या.
3. या घटनेचा ओबीसी राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
→ ओबीसी मतदारांमध्ये विभागणी होण्याची शक्यता असून, भाजपच्या रणनीतीवरही याचा परिणाम होऊ शकतो.
4. छगन भुजबळांनी या टाळण्यावर प्रतिक्रिया दिली का?
→ भुजबळांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी, त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
5. पुढील राजकीय घडामोडी कोणत्या असू शकतात?
→ ओबीसी समाजातील एकीच्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो आणि पंकजा मुंडे यांचा स्वतंत्र राजकीय अजेंडा पुढे येऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.