Beed : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडील थकीत जीएसटी रकमेसाठी जीएसटी आयुक्तालयाने जप्तीची कारवाई सुरू केल्याने संतप्त झालेल्या समर्थकांनी आम्ही ऊसतोड मजूर वर्गणी करून १९ कोटी थोबाडावर फेकून मारू, अशी आरोळी ठोकत लाखोंचे धनादेश देत मदतीचा हात पुढे केला. मात्र, कारखान्यावर इतर बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकलेले आहे. त्याची मगरमिठी भाजप नेत्या पंकजा मुंडे कशी सोडविणार असा प्रश्न आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी परळीजवळ वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभारला. कारखान्याच्या साखळीत एकेकाळी त्यांनी २० हून अधिक कारखान्यांची साखळी निर्माण केली. आपण अगोदर ऊसतोड कामगारांचे नेते असून, नंतर कारखानदार आहोत, असे दिवंगत मुंडे नेहमी म्हणायचे. दरम्यान, कारखाना उभारणी, कारखाना चालविणे, इतर कारखान्यांची खरेदी आदी बाबींसाठी वैद्यनाथ कारखान्याने कर्ज घेतले. पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आली.
कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे ऊस उत्पादन घटले आणि कारखान्याची गाळप साखळी विस्कळीत झाली. याच काळात पंकजा मुंडे यांच्याकडे मंत्रिपद असल्याने कारखान्याचा कारभार पाहणाऱ्यांच्या सदोष नियोजनामुळे कारखान्यावरील कर्ज वाढतच गेले. आता कर्जाचा आकडा शेकडो कोटीत आहे. अनेक बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी नोटिसांच्या पुढे जाऊन जप्तीच्या कारवाया सुरू केल्या आहेत.
मुंडे समर्थक चांगलेच संतापले...
कारखान्याकडे ऊसतोड मजूर-मुकादमांचे देणे, ऊस उत्पादकांची एफआरपी, कर्मचाऱ्यांचे वेतन व त्यांचे पीएफ अशा रकमाही थकलेल्या आहेत. दरम्यान, असेच एका बँकेने थकीत कर्जासाठी जप्त केलेल्या मालमत्तेवरच जीएसटी विभागाने थकीत १९ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू केली. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये चांगलाच संताप निर्माण झाला आहे. एकीकडे राज्यातील इतर कारखान्यांना केंद्रीय सहकार विभागाने शेकडो कोटी रुपयांची मदत केली असताना मुंडेंचा वैद्यनाथ कारखाना या मदतीतून वगळला आहे. कारखाना मदतीतून वगळल्याचे, कारखान्यावरील जीएसटी विभागाची कारवाई; तसेच कारखान्याबाबतच्या आर्थिक अडचणींवर पंकजा मुंडे यांनी थेट भाष्य केले आहे. या कारवाईवर मुंडे समर्थक चांगलेच संतापले आहेत.
पंकजाताई कसा मार्ग काढणार...
आम्ही लोकवर्गणीतून ही रक्कम जमा करू आणि ती थोबाडावर फेकून मारू. आम्ही ऊसतोड मजुरांनी भगवानगड उभा केलाय, भगवान भक्तिगड, गहिनीनाथ गड उभा केलाय आणि गोपीनाथगडसुद्धा उभा केलाय. आमच्या दैवतांसाठी आम्ही प्रत्येक गावात कोटी दोन कोटी सहज दान देतो तुमचा माज जिरवण्यासाठी आम्हाला दोन दिवससुद्धा लागणार नाहीत. तुम्ही सगळ्यांना गृहीत धरून येड्यात काढू शकता, पण आमच्या नादी लागाल...तर तुम्ही परत दुर्बीण लावूनसुद्धा दिसणार नाहीत, आता आगीत हात घातलाचा आहे तर परिणामांनाही तयार राहा, असे आव्हान देत समर्थकांनी एक लाख रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत मदतीसाठी हात पुढे केले आहेत. काहींनी रकमेचा रकानाही कोरा ठेवत पंकजा मुंडे लिहितील तो आकडा मान्य असेल असे जाहीर केले आहे, तर काहींनी आम्ही वडिलोपार्जित जमिनी विकून मदत करू, अशी घोषणा केली आहे. दरम्यान, जीएसटी रकमेसाठी मदत होत असली तरी कारखान्यावर इतर बँकांचे कोट्यवधींचे थकीत कर्ज कसे फेडायचे हा कळीचा मुद्दा आहे. त्यावर आता पंकजा मुंडे कसा मार्ग काढतात ते पाहावे लागणार आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.