

Parbhani Hingoli News: परभणी-हिंगोली विधान परिषदेचे आमदार सईद खान यांचे वडील तथा पाथरी येथील ज्येष्ठ नागरिक शेरगुल खान यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पाथरीसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार सईद खान कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
शेरगुल खान हे अत्यंत साधी राहणी, शांत स्वभाव, सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांनी आपल्या कुटुंबावर उत्तम संस्कार करत समाजात आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे खान कुटुंबाने ज्येष्ठ आधारवड गमावला आहे.
त्यांच्यावर उद्या (रविवार) दुपारी 2 वाजता पाथरी येथे मुस्लिम धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
शेरगुल खान यांच्या पश्चात विधान परिषदेचे आमदार सईद खान, पाथरीचे नगराध्यक्ष आसिफ खान, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मेहराज खान, तसेच तीन मुले, सुना, नातवंडे आणि असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
आमदार सईद खान यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती देताना आपल्या शोकभावनाही व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, माझे वडील, शेरगुल खान, आम्हा सर्वांना कायमचे सोडून गेले. बाबा, तुमच्या खांद्यावर बसून जग पाहिलं, तुमच्या सावलीत निश्चिंत आयुष्य जगलो. आज तीच सावली कायमची हरवली. तुमचं प्रेम, माया, राग, काळजी आणि प्रत्येक शब्द आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. पण आता “बाबा” म्हणून हाक मारली तरी प्रतिसाद मिळणार नाही, हीच जाणीव मनाला आतून तुटवून टाकते.
अल्लाह, माझ्या बाबांना आपल्या रहमतेच्या सावलीत स्थान दे. त्यांच्या कबरीला नूर दे आणि जन्नत-उल-फिरदौस नसीब कर. तुमची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. आयुष्य पुढे जाईल, पण प्रत्येक आनंदाच्या आणि प्रत्येक कठीण प्रसंगी तुमची उणीव कायम बोचत राहील. बाबा… तुम्ही आमच्या हृदयात कायम जिवंत राहाल. अलविदा असंही खान यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.