BJP or NCP Who will be fight in Parbhani Loksabha elections: शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झाल्याने भारतीय जनता पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून पक्षातील इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने परभणीसाठी जोर लावल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
2024च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाने दोन महिन्यांपासून मैदानात उतरण्याची पूर्ण तयारी केली. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून तर माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली. जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे.
महायुतीच्या समन्वयकपदी त्यांची नियुक्ती केल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत असल्याच्या चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात होत्या. परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांचे पुत्र व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचेही नाव पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यातच डॉ. सुभाष कदम यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपटलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी असलेल्या डॉ. केदार खटींग यांनी संघाच्या जबाबदारीतून मुक्त होत मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. इच्छुकांच्या यादीत त्यांचेही नाव आहे. पक्षाचे पदाधिकारी बाबासाहेब जामगे यांनीही समाजमाध्यमातून आपले नाव पुढे केले होते. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्ष कार्यकर्त्यांनी प्रवास केला. त्यामध्ये इच्छुक उमेदवारांनी हिरिरीने सहभाग नोंदवला.
पक्षाने मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा ( Jagdish Deoda ) यांना हिंगोली, नांदेड व परभणीचा ( Parbhani ) आढावा घेण्यासाठी विशेष जबाबदारी सोपवली. मात्र, देवडा यांनी परभणीचा दौरा रद्द केला. तेव्हाच पक्ष कार्यकर्त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP ) उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले राजेश विटेकर Rajesh Vitekar यांनीही विविध कार्यक्रमांमधून संपर्क करण्यास सुरुवात केली.
संघ परिवारातील प्रकाशन संस्थेने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी परभणीच्या जागेसाठी आग्रही मागणी केल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासमोर पेच निर्माण झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ( Loksabha Election ) मिळालेली मते आणि राजकीय स्थितीचा विचार करता परभणीच्या जागेबाबत राष्ट्रवादीचा जोर वाढल्याने भाजपच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्या उपस्थितीत मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.