Parbhani News, 01 Jan : नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचयात निवडणुकीत परभणी जिल्ह्यात भाजपने 12 मुस्लिम उमेदवार निवडून आणत विरोधकांना धक्का दिला होता. मुस्लिम मतदार भाजपकडे वळत असल्याचे हे चित्र सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धोक्याचे वाटू लागले होते. त्यामुळे परभणी महापालिकेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीने निम्म्या जागेवर मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
परभणी शहराची सामाजिक रचना पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने 57 पैकी तब्बल 27 उमेदवार हे मुस्लिम समाजातून देत आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे परभणी महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. सात जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला सोडल्यानंतर उर्वरित जागांपैकी निम्म्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार देत अजित पवारांनी मास्टर स्ट्रोक लगावल्याचे बोलले जाते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही 48 पैकी तब्बल 18 मुस्लिम चेहरे मैदानात उतरवले आहेत. परभणीत देखील दिल्ली ते गल्लीपर्यंतच्या निवडणुकीत कायम खान पाहिजे की बाण? असा प्रचार केला जायचा. परंतु राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राजकारणाची दिशा आता बदलली आहे. सगळ्याच पक्षांना मुस्लिमांची निर्णायक मतं खुणावत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
भाजपने आपल्या 41 उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी यात मुस्लिम समाजाला किती प्रतिनिधित्व दिले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काही ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्याची खेळी केली होती. ती कमालीची यशस्वी ठरली होती. महापालिका निवडणुकीची सगळी सुत्रं माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या हाती आहेत. काँग्रेसमध्ये असताना त्यांनीच सर्वाधिक जागा जिंकत महापालिका आपल्या ताब्यात घेतली होती.
महापालिका निवडणुक लढवण्याचा व संपूर्ण यंत्रणा हाताळण्याचा त्यांचा अनुभव पहाता भाजपला इथे शतप्रतिशत यशाची अपेक्षा आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येत महापालिका निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा वाटपात 8 जागा देण्यात आल्या होत्या, परंतु त्यांनी सहाच उमेदवार दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेच सर्वाधिक उमेदवार रिंगणात असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.