

Parali Municipal Council Election : भाजपने अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये काँग्रेससोबत आणि अकोट नगरपरिषदेमध्ये एमआयएमसोबत केलेली आघाडी राज्यभरात टीकेचा विषय ठरली. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने या दोन्ही आघाड्या तोडण्यात आल्या. यानंतर अवघ्या 24 तासांत परळीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. यात एमआयएमलाही सोबत घेण्यात आले आहे.
परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने गटनेता निवडीत युती केली आहे. यात नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या गटात मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या (MIM) सदस्या आयेशा मोसीन शेख यांनाही सोबत घेण्यात आले आहे. या युतीची राजकीय वर्तुळात नव्यानं चर्चा होऊ लागली आहे.
परळीतील या नव्या राजकीय समीकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी टोला लगावला आहे. दानवेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला आहे. सोशल मीडियावर दानवे यांनी शिंदेंना डिवचलं आहे. ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच जमलं तुमचं! हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? परळीतल्या या नव्या 'सत्तेच्या संसाराचा' चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. ही नवी युती मुबारक, असा खोचक टोला दानवेनी शिंदेंना लगावला.
एकनाथ शिंदे जी, परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची जी युती झाली आहे, ती पाहून आता तुमच्या 'बंड' आणि 'तत्त्वांच्या' गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता, आता तुम्ही थेट 'एमआयएम-वासी' झालात? असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोण एमआयएम? ओळखत नाही, असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
परळी नगरपरिषद निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गटनेत्याची निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड झाली. या गटात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस -16 , भाजप -7, अपक्ष - 4, शिवसेना - 2, एमआयएम - 1, अशा 24 जणांचा समावेश आहे.
भाजपचे 7 आणि अपक्ष 2 अशा 9 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून पवन मुंडे यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड केली आहे. भाजप एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारच्या आघाडीमध्ये नसल्याचे दाखवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.