

परभणीतील सात नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सत्तेपेक्षा अधिक बोर्डीकर कुटुंबाची प्रतिष्ठा आणि भवितव्य पणाला लागले आहे.
जिंतूर, सेलू आणि गंगाखेड येथील निकाल पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा ठरणार आहेत.
भाजपला स्वबलावर विजय कठीण गेल्याने शिंदे शिवसेनेचे पाठबळ घ्यावे लागले असून हे पक्षाच्या संघटनात्मक सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उभे करते.
गणेश पांडे
Parbhnai News : परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकांत यंदा केवळ सत्तेची चुरस नाही, तर थेट जिल्ह्याच्या राजकीय वजनदारांच्या नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या बाप-लेकीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून भाजपच्या स्थानिक संघटनात्मक सामर्थ्याची खरी कसोटीही असणार आहे. भाजपने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा संकल्प जाहीर केला असला तरी वास्तवात केवळ जिंतूर, सेलू आणि गंगाखेड या तीन पालिकांतच या पक्षाला बलवान उमेदवार उभे करता आले.
पूर्णा आणि मानवत येथे भाजपला शिवसेनेकडे नगराध्यक्षपद आणि बहुतांशी जागा सोडाव्या लागल्या. पाथरीतही उमेदवार असतानाही अंतर्गत कलहामुळे इच्छुकांना मैदानाबाहेर राहावे लागले आणि याचा थेट परिणाम नेतृत्वाच्या विश्वसनीयतेवर झाला. जिंतूर, सेलू आणि गंगाखेड येथील निकालच आता बोर्डीकरांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा ठरणार आहे. एकूणच भाजपच्या स्वबळाचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कुबड्या घ्याव्या लागल्या, असेच चित्र होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील सोनपेठ, मानवत व पाथरी या तीनही पालिका प्रतिष्ठेच्या बनवल्या आहेत. इथे विजय मिळाला तर थेट त्यांच्या राजकीय प्रभावाची ताकद स्पष्ट होणार आहे. जिंतूरमध्ये माजी आमदार विजय भांबळे आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यातील पारंपरिक वर्चस्वाची लढाई पुन्हा झाली आहे. गंगाखेडमध्ये माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी मेहुणे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठबळावर अथवा जिंकू किंवा मरू अशा भूमिकेतून मैदान गाजवले.
केंद्रे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांचा अनपेक्षित पण मजबूत पाठिंबा मिळाला. गंगाखेडमधील ही लढत विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासाठीही प्रतिष्ठेची आहे. स्वतःच्या कार्यक्षेत्रात स्वबळाचा आत्मविश्वास नसल्याने इतर पक्षांतील नेत्यांची मोट बांधावी लागणे, हे त्यांच्या प्रतिमेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. पाथरीत 35 वर्षे अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांच्या बालेकिल्ल्यावर यंदा आमदार विटेकर, शिवसेनेचे सईद खान यांनी संयुक्तरीत्या धडक दिली.
दुर्राणींचे वर्चस्व अबाधित राहणार की विरोधकांनी टाकलेला शह राजकीय समतोल ढवळून काढणार? यावर अनेकांचे भवितव्य ठरणार आहे. सेलूतील विनोद बोराडे व हेमंत आढळकर, मानवतचे डॉ. अंकुश लाड, सोनपेठचे चंद्रकांत राठोड आणि व्यंकटराव कदम, गंगाखेडचे रामप्रभू मुंडे, पूर्णेचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम या सर्व स्थानिक राजकीय सूत्रधारांची प्रतिष्ठासुद्धा या निवडणुकांवरच अवलंबून आहे. या संपूर्ण जिल्ह्यातील निवडणूक मैदानावर साम, दाम, दंड, भेद या सर्वच पैलूंचे दर्शन झाले. २१ डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच कुणाचे नेतृत्व बळकट होणार आणि कुणाचे अस्तित्व धोक्यात येणार? हे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
FAQs :
1. परभणीतील ही निवडणूक बोर्डीकरांसाठी प्रतिष्ठेची का ठरली?
कारण सात नगरपालिकांमध्ये त्यांचे राजकीय अस्तित्व आणि नेतृत्वाची ताकद तपासली जात आहे.
2. जिंतूर–सेलू–गंगाखेडचे निकाल इतके महत्त्वाचे का आहेत?
हे तीन निकाल बोर्डीकरांच्या राजकीय स्वीकारार्हतेचा निकाल ठरवतील.
3. भाजपला शिवसेनेचे पाठबळ का घ्यावे लागले?
स्वबळ कमी पडल्याने आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कमजोरीमुळे.
4. परभणीमध्ये भाजपचे संघटनात्मक सामर्थ्य कसोटीवर का आले आहे?
कारण नेतृत्वावरील विश्वास, अंतर्गत गटबाजी आणि उमेदवार व्यवस्थापन प्रश्नात आले आहेत.
5. या निवडणुकांचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम करतील?
निकाल BJP–Shiv Sena समीकरण, पश्चिम मराठवाड्यातील शक्ति-संतुलन आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.