परभणीत गटबाजी आणि स्वार्थी राजकारणामुळे आगामी निवडणुकीची दिशा पूर्णपणे बदलल्याची चर्चा आहे.
बोर्डीकर, भांबळे, जाधव आणि वरपूडकर यांच्या निर्णयावर परभणीतील राजकीय समीकरण ठरणार आहे.
गटबाजीमुळे महायुती आणि आघाडी दोघांच्या रणनीतींवर परिणाम होत असून, मतविभाजनाची शक्यता वाढली आहे.
Local Body Election 2026 : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना, सत्तारूढ महायुती वा विरोधी महाविकास आघाडी दोन्हींतील मातब्बर नेते गटबाजीच्या दलदलीत अडकले आहेत. वरकरणी ऐक्याचे सूर, पण पडद्यामागे चाललेला शह-काटशहाचा खेळ आता उघडपणे समोर आला आहे. कार्यकर्ते संभ्रमात, तर संभाव्य उमेदवार अक्षरशः गोंधळलेल्या स्थितीत आहेत. नेत्यांनो, तुमच्या निवडणुकीवेळी युती-आघाडी पण आमच्या वेळी बिघाडी का? असा सवाल इच्छुकांनी केला आहे.
परभणी जिल्ह्यातील प्रमुख पक्षांना गटबाजीची पंरपरा नवा नाही. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या गटबाजीमुळे स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्रातील संस्था तसेच विधानसभेपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये या पक्षांना फटका बसत आला आहे. प्रत्येक पराभवानंतर पोस्टमॉर्टम झाले, पक्षश्रेष्ठींनी इशारेही दिले, मात्र स्थानिक नेत्यांनी त्यातून धडा घेतला नाही. स्वतःचे राजकीय अस्तित्व, कुटुंबीयांचा स्वार्थ आणि सत्तेतील वर्चस्व टिकवण्यासाठी या नेत्यांनी वेळोवेळी पडद्यामागून सोयीच्या भूमिका घेतल्या.
निष्ठावंत कार्यकर्त्यांचे राजकीय बळी देऊन सत्तेची समीकरणे जुळविण्याची परंपराच कायम राहिली आहे. सत्तारूढ महायुतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे प्रमुख घटक असून या तिन्ही पक्षांत गटबाजी स्पष्टपणे जाणवते. भाजपमध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्यातील संघर्ष हा दीर्घकालीन असून, वेळप्रसंगी तडजोडी झाल्या तरी दोन्ही गटांमधील कटुता संपलेली नाही. परिणामी अनेक कार्यकर्त्यांना या संघर्षाचा फटका बसला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांचा अपवाद वगळता इतर नेत्यांचा प्रभाव मर्यादित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे आणि जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या क्षेत्रात तुलनेने समन्वय दिसतो. तरीही स्थानिक पातळीवर गटबाजीची शक्यता नाकारता येत नाही. विरोधी महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे प्रमुख घटक आहेत. या पक्षात खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यातील उघड संघर्ष, वेळप्रसंगीचे तात्पुरते ऐक्य आणि पडद्यामागील राजकीय खेळ कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकतात.
काँग्रेस पक्ष अद्यापही वरपुडकर यांच्या पक्षांतराच्या धक्क्यातून सावरलेला नाही. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर अनेक वरिष्ठ कार्यकर्ते नाराज आहेत. माजी आमदार सुरेश देशमुख यांनी तटस्थ भूमिकेत राहणे पसंत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात खासदार फौजिया खान, माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे पक्षाच्या अस्तित्वासाठी सक्रिय झाले आहेत, मात्र स्थानिक पातळीवर त्यांनाही अंतर्गत मतभेदांचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात गटबाजी, शह-काटशहा आणि पडद्यामागील डावपेच हे नवे नाहीत, पण या निवडणुकीत या खेळींची तीव्रता अधिक वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केवळ पक्षनिष्ठेची कसोटी नसून, प्रत्येक पक्षातील अंतर्गत ऐक्य आणि विश्वासार्हतेची खरी परीक्षा ठरणार आहे.
निवडणुकांत प्रतिष्ठेची लढाई
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सात नगरपालिका, एक नगरपंचायत, एक महापालिका, नऊ पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत सर्वच पक्षांच्या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्तारूढ महायुतीतील पक्षांना सत्ता टिकवण्याचे आणि विरोधकांना अस्तित्व दाखवण्याचे आव्हान उभे आहे. मात्र, अंतर्गत गटबाजी आणि पडद्यामागील सोयीच्या डावपेचांमुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक इच्छुक उमेदवार स्वतःच्या पक्षातील संभाव्य दगाफटक्यांच्या भीतीने संभ्रमात आहेत.
1. परभणीत सध्या कोणत्या प्रकारची गटबाजी दिसत आहे?
स्थानिक नेते स्वतःच्या स्वार्थासाठी वेगवेगळे गट तयार करत आहेत, त्यामुळे एकजुटीचा अभाव जाणवतो.
2. या गटबाजीचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
मतविभाजनामुळे काही गटांना नुकसान आणि विरोधकांना फायदा होऊ शकतो.
3. बोर्डीकर, भांबळे, जाधव आणि वरपूडकर यांच्या भूमिकेचे महत्त्व काय आहे?
हे चारही नेते स्थानिक पातळीवर प्रभावशाली असून, त्यांचा निर्णय परभणीतील समीकरण ठरवू शकतो.
4. स्वार्थी राजकारणाचा उल्लेख का केला जातो आहे?
पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक स्वार्थ व राजकीय फायद्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे.
5. परभणीतील आगामी निवडणुकीत कोणते मुख्य मुद्दे राहतील?
गटबाजी, विकासाच्या आश्वासनांची पूर्तता आणि नेतृत्वातील एकता — हे तीन प्रमुख मुद्दे असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.