

Shivsena UBT : शिवसेना पक्षाला पहिला खासदार आणि निवडणूक चिन्ह मिळवून देणाऱ्या परभणीकरांनी कायम ठाकरेंना भक्कम साथ दिली. बाळासाहेब ठाकरे असो की त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी परभणीकरांच्या मनातलं ओळखून उमेदवार दिले आणि ते मोठ्या मताधिक्यांनी निवडूनही आले. मात्र, परभणी जिल्ह्याच्या खासदाराला बंडखोरीची सवयच जडली आहे का? असा प्रश्न तीन टर्म खासदार राहिलेल्या संजय उर्फ बंडू जाधव यांच्या पक्ष सोडून जाण्याने निर्माण झाला आहे.
अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील, गणेश दुधगावकर, संजय जाधव अशी ही मोठी यादी आहे. खासदार पक्ष सोडून गेले तरी परभणीचा मतदार मात्र कायम शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी कायम राहिला. अगदी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना फुटल्यानंतरही. अर्थात दोन टर्म आमदार, तीन टर्म खासदार राहिलेल्या संजय जाधव यांनीही पक्षनिष्ठा कायम ठेवली होती. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद असूनही त्यांनी शिवसेना सोडली नव्हती.
या निष्ठेचे फळ म्हणूनच संजय जाधव यांना तिसऱ्यांदा परभणी लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिली होती. मोठा जनसंपर्क असलेला सर्वसामान्यांचा नेता म्हणून बंडू जाधव परभणीकरांना परिचित आहेत. मग नेमकी अशी काय मजबुरी होती? की पंचवीस तीस वर्षाचा शिवसेनेशी आणि ठाकरे कुटुंबाशी असलेला ऋणानूबंध तोडून जाधव यानी शिंदेचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जाधव यांनी बंडखोरी केली म्हणून शिवसैनिक परभणीसह जिल्ह्यात रस्त्यावर उतरले आहेत. फोटोला चपला, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ते आपल्या संतापाला वाट मोकळी करून देत आहेत.
शिवसैनिकांचा राग सहाजिकच आहे, रक्ताचे पाणी आणि घाम गाळत त्यांनी हातात भगवा घेऊन संजय जाधव यांच्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली. त्यांना विधानसभा, लोकसभा दाखवली. आता तेच या मतदारांना वाऱ्यावर सोडून गेल्यामुळे त्यांच्यावरही गद्दारीचा शिक्का बसला. एकीकडे जाधव यांच्याविरोधात संताप आहे, तर दुसरीकडे सद्य राजकीय परिस्थिती, लोकसभा मतदारसंघाचा रखडलेला विकास, सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने होणारे दबावाचे राजकारण यावर कुठे तरी उपाय म्हणून जाधव यांनी हा पर्याय स्वीकारला का? याचाही कुठे तरी विचार व्हावा, असाही सूर त्यांचे समर्थक आणि काही सर्वसामान्यांकडून निघू लागला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी परभणीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या निर्णयावरून विरोधकांकडून आणि काही कार्यकर्त्यांकडून बंडखोरीचा आरोप केला जात असला, तरी हा शिक्का मारण्यापूर्वी त्यांच्या राजकीय प्रवासाचा आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार होणे आवश्यक असल्याची भावना अनेक समर्थक व्यक्त करत आहेत.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या संजय जाधव यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. हिंदुत्वाच्या विचारासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे, अनेक न्यायालयीन खटल्यांना सामोरे जाणे आणि संघटना वाढविण्यासाठी आयुष्याची अनेक वर्षे खर्च करणे हा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. दोन वेळा परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि तीन वेळा परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आलेल्या जाधव यांना मात्र बहुतांश काळ विरोधी बाकावर बसूनच काम करावे लागले.
विरोधी पक्षात राहून मतदारसंघाचा विकास करणे हे कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी मोठे आव्हान असते. विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेशी जवळीक आवश्यक असल्याचे मत त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केले जात आहे. शिवसेना फुटली तेव्हा संजय जाधव यांनी पक्षनिष्ठा जपत पक्ष नेतृत्वासोबत राहणे पसंत केले. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपद वाटपाबाबत नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती, मात्र पक्ष सोडला नव्हता.
आता त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत चर्चा रंगत असताना समर्थकांचे म्हणणे आहे की, जाधव हे हिंदुत्वाचा विचार सोडून कोणत्याही विरोधी विचारधारेच्या पक्षात जात नाहीत. उलट ते शिवसेनेच्या (Shivsena) मूळ विचारसरणीशीच राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांची तुलना पूर्वी विचारधारा बदलून इतर पक्षांत गेलेल्या नेत्यांशी करणे योग्य ठरणार नाही. परभणीच्या राजकारणात यापूर्वीही अनेक खासदारांनी शिवसेना सोडून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यावेळी विचारधारेत बदल झाल्याची टीका झाली होती.
संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या बाबतीत मात्र हिंदुत्व आणि शिवसेनेच्या विचारांशी तडजोड झालेली नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. दरम्यान, त्यांच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलनांची तयारी सुरू असली तरी जाधव यांनी गेल्या काही वर्षांत पक्षाच्या बरोबरीने स्वतःची स्वतंत्र राजकीय यंत्रणा उभी केली असल्याचे 2019 आणि 2024 च्या निवडणुकांमधून दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे अनेकांचे मत आहे. संजय जाधव यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यापूर्वी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा, पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा, मतदारसंघातील विकासासाठीच्या प्रयत्नांचा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा वस्तुनिष्ठ विचार होणे आवश्यक असल्याची भावना अनेकजण बोलून दाखवत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.