

ZP Election News : रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका अखरे पार पडल्या. मतदारांमध्ये उत्साह देखील दिसून आला. परंतु काहींनी मतदानावर बहिष्कार टाकत यंत्रणा, राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरूद्धचा आपला संताप व्यक्त केला. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विधानसभा मतदार संघात येणाऱ्या बोथ, ताडा या गावातील ग्रामस्थानी रस्ता आणि पुलाची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकला.
सेलू तालुक्यातील चिकलठाणा बुद्रुक गटातील बोथ व बोथ तांडा गावातील 466 मतदारांनी गावाl रस्ता व पुल उभारावा या मागणीसाठी मतदान न करण्याची ईश्वर शपथ घेऊन मतदानावर बहिष्कार टाकला. राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात हे गाव येते. देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे उलटले तरी बोथ या गावास अद्यापही रस्ता नाही. गावाजवळील करपरा नदीवर पूल नाही. त्यामुळे आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीत करपरा नदीला पूर आल्यामुळे पाणी गावात शिरल्याने शेळ्या, बैल वाहून गेले होते. घरातील धान्य व संसार उपयोगी वस्तू नागरिकांच्या डोळ्या समोर पाण्यात वाहून गेल्याने मोठे अर्थिक नुकसान झाले. शासनाने तुटपुंजी मदत करून नुकसानग्रस्तांचे अश्रु पुसण्याचे प्रयत्न केले. गेल्या पंधरा दिवसापूर्वी बोथतांडा येथील महिलेला प्रस्तुती साठी वेळेवर औषधोपचार मिळाले नसल्याने आपल्या पोटच्या बाळाला गमवावे लागले. तर महिला मृत्यूचा दाढेतून बचावली.
वाई, बोथ व बोथतांडा अशी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या या गावात वाई येथे 1 मतदान केंद्र आहे. या ठिकाणी पुरुष 545 , स्त्री 553 असे एकूण 1089 मतदार आहेत, तर बोथ व बोथ तांडा स्वतंत्र मतदान केंद्र असून या ठिकाणी पुरुष 212, स्त्री 254 अशे एकूण 466 मतदार आहेत. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची ग्रामस्थांनी भेट घेऊन निवेदन दिले होते. जिल्हा, तालुका प्रशासनाकडे निवेदन देऊन रस्ता व पुल उभारण्यात यावा अशी वारंवार मागणी व पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
सेलूचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव, चारठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी दळवे, सरपंच सुधीर आघाव यांनी बोथ येथे भेट घेऊन मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतू मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे दिलेल्या निवेदनानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदानावर शंभर टक्के बहिष्कार टाकून निषेध नोंदवला.
'लोकप्रतिनी, शासन दरबारी रस्ता व पुल उभारण्यात यावा अशी वारंवार तोंडी, लेखी मागणी करण्यात येत आहे. रस्ता उपलब्ध नसल्याने आरोग्य, शिक्षण इतर सुविधा उपलब्धतेनुसार मिळत नाहीत. करपरा नदीचा पुराचा गावास वेढा पडतो. कित्येक दिवस विजपुरवठा खंडित होतो. रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा अशी अपेक्षा गावच्या पोलीस पाटील सुनिता डोंगरे यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.