

Parbhani Municipal Corporation News: परभणी जिल्हा परिषद -पंचायत समितीच्या निवडणूकीत जिल्ह्यातील सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता झेडपीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याची उत्सूकता वाढली आहे. प्रचारा दरम्यान नेते एकमेकांवर तुटून पडले होते. खासदार संजय जाधव, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, विजय भांबळे, सुरेश वरपूडकर आदींनी प्रचारात स्वतःला झोकून दिले होते.
परभणी जिल्हा परिषदेच्या 54 गट,108 गणात शनिवारी मतदान होणार आहे. गेल्या आठ-दहा दिवसात जिल्ह्याचा ग्रामीण भाग एकमेकांवरील आरोपांच्या फैरींनी दणाणून गेला होता. उमेदवार, कार्यकर्त्यांनी गाव, वस्ती, तांडे पिंजून काढले होते तर अनेक स्थानिक नेत्यांनी शेकडो बैठका, सभा घेऊन आपली प्रतिष्ठा पणाला लावली.
या निवडणूकीसाठी तुरळक जागांचा अपवाद वगळता कुठल्याच पक्षात युती झाली नाही की आघाडी. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील राजकीय समिकरणे देखील वेगवेगळी होती. कुठे दुरंगी, कुठे तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार आहेत.
या मिनी मंत्रालयाच्या निवडणूकीत ग्रामीण भाग ढवळून निघाला आहे. तब्बल आठ वर्षानंतर निवडणूका होत असल्यामुळे अनेक नवे चेहरे मैदानात उतरल्याने निवडणूकीची रंगत वाढली आहे. जिल्ह्यातील सातशे पेक्षा अधिक गावांमध्ये या निवडणूकांमुळे स्थानिक राजकारण तापले होते. दररोज येणारे विविध पक्षाचे नेते, उमेदवार तसेच त्यांच्या बैठका, सभांनी, एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडून नेते, उमेदवारांनी धुराळा उडवून दिला होता, अखेर आज गुरुवारी आरोप-प्रत्योरापांच्या तोफा थंडावल्या.
जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत खासदार संजय जाधव यांनी परभणी, पूर्णा तालुक्यातील अनेक गट, गणात सभा घेतल्या. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू, जिंतुर, परभणी तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करुन मोठ्या संख्येने सभा घेतल्या. त्याच बरोबर माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी परभणी, पाथरी, काँग्रेसचे माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी पाथरी, शिवसेनेचे सईदखान यांनी पाथरी, मानवत, आमदार राजेश विटेकर यांनी सोनपेठ, मानवत, पाथरी तालुक्यात अनेक ठिकाणी सभा घेत मतदारांना आवाहन केले.
राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी जिंतुर व सेलू तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड, पूर्णा, पालम तालुक्यात तसेच माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे यांनी गंगाखेड तालुक्यात जोर लावला आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत 54 गटात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 49 उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेसने 42 उमेदवार दिले आहेत. त्याच बरोबर शिवसेनेने 25, ठाकरेसेनेने 23, काँग्रेसने 11 उमेदवार दिले असून 87 अपक्ष असे एकूण 247 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पाथरी तालुक्यात चौरंगी लढत, पूर्णा तालुक्यात तिरंगी, गगाखेडध्ये तिरंगी, पालमध्ये दुरंगी, सोनपेठमध्ये दुरंगी, मानवतमध्ये तिरंगी, सेलूमध्ये तिरंगी, जिंतुरात दुरंगी तर परभणी तालुक्यात चौरंगी लढतीची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.