परळी वैजनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे अपघातानंतर ४० दिवसांनी शहरात परतले. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्यदिव्य स्वागत करत सभेचे आयोजन केले.
मात्र, या सभेवेळी व्यासपीठावर संसदेची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभेवर निवडून आलेले धनंजय मुंडे आता आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. अशातच धनंजय मुंडे हे अपघातानंतर परळीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतादरम्यानच्या व्यासपीठावर संसदेची प्रतिकृती तयार करण्यात आल्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे टेन्शन वाढले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्रीही होते. धनंजय मुंडे यांचा बीडच्या राजकारणात वरचष्मा असल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे पंकजा मुंडे यांना भाजप डावलत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असते. त्यामुळे पंकजा मुंडेंचे हे टेन्शन संपते न संपते तोच धनंजय मुंडे यांच्या व्यासपीठावर संसदेची प्रतिकृती लावण्यात आल्यामुळे त्यात भरच पडली आहे.
खरं तर बीड लोकसभा मतदारसंघावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व राहिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर डॉ.प्रीतम मुंडे या दोन वेळा याच मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत. त्या पुढील निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत.
त्यामुळे सातत्याने मुंडे बंधु-भगिनी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. त्यातच आता धनंजय मुंडेंच्या व्यासपीठावर विधीमंडळाऐवजी संसदेची प्रतिकृती उभारण्यात आल्यामुळे धनंजय मुंडे लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत का? विधानसभेनंतर लोकसभेसाठीही बहीण-भावात लढत होते की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, देशात विकासाच्या दृष्टीने पहिल्या दहामध्ये आपला मतदारसंघ आल्याशिवाय शांत बसणार नाही. यामुळे त्यांची लोकसभा लढण्याची चर्चा आणखी वाढलीय. या सर्व चर्चेमुळे बीडमध्ये काय होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.