Maratha Reservation News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे महायुतीला फटका बसला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच भाजपची आणि माझी वैयक्तिक भूमिका राहिली आहे. पण ते देतांना कोणाच्या वाट्याचे दिले जाऊ नये, ही देखील आमची भूमिका आहे. एवढेच नाही तर राज्यात भाजपची सत्ता असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते टिकवून दाखवले.
पण या मुद्यावर राजकारण करणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, (Sharad Pawar) उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका लेखी स्वरुपात जाहीर करावी. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा आहे, असे लेखी देऊन त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात तसे आश्वासन द्यावे, असे खुले आव्हान भाजपचे विधानसभा निवडणूक संचालन प्रदेश समिती संयोजक तथा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीला दिले.
`सकाळ`च्या थेट भेट मध्ये संवाद साधताना दानवे यांनी मराठा आरक्षणावर आपली व पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपने लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बसलेला फटका लक्षात घेता विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात पक्षातील अनुभवी मराठी चेहऱ्यावर विश्वास दाखवल्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी राज्यातील सगळ्या विषयांना हात घालत आपली भूमिका मांडली.
लोकसभा निवडणुकीत जे घडले ते विधानसभा निवडणुकीत घडणार नाही. लोकसभा निवडणुकीत सगळा मराठा समाज आमच्या विरोधात होता, असे जे चित्र निर्माण केले जात आहे, ते चुकीचे आहे. (Raosaheb Danve) तसे असते तर आमच्या उमेदवारांचे डिपाॅझीट जप्त झाले असते. निवडणुकीत विरोधकांनी मतदारांना कन्फ्यूज केले आणि आम्ही त्यांचा हा डाव हाणून पाडण्यात कमी पडलो, अशी कबुलीही दानवे यांनी दिली. मराठा आरक्षणावरून राज्यातील महायुती सरकारवर टीका करणाऱ्या महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांना दानवे यांनी जाब विचारला.
मराठा आरक्षणाचा लढा आजचा नाही तर 1982 पासूनचा आहे. अण्णासाहेब पाटील यांनी तो सुरू केला आणि त्यासाठी बलिदान दिले. आरक्षणाचा लढा हा बेचाळीस वर्षांचा आहे. या दरम्यान, शरद पवार हे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे प्रमुख होते. मग मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही ?
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले तेव्हा आम्ही मराठा आरक्षण दिले. नुसते दिले नाही तर ते न्यायालयात टिकवून दाखवले. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका जाहीर न करता आमच्यावर टीका करायला सुरवात केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची आजही भूमिका आहे. पण ते कोणाच्या वाट्याचे नको, हे ही तितकेच खरे.
पण महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत. माझे या नेत्यांना आव्हान आहे, की त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे ही मागणी आम्हाला मान्य आहे, आमचा त्याला पाठिंबा आहे, हे जाहीर करावे. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख करावा, असे आव्हान रावसाहेब दानवे यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारने गरीबांच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या आहेत. राज्यात लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बील माफीसह अनेक योजना राबवल्या जात आहेत. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्यातील सरकारच काही करू शकते, हा विश्वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. लोकसभेला जे घडले ते विधानसभेला घडणार नाही, याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.