PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत’ संपूर्ण सर्वेक्षण मोहिमेत त्यांच्या गुजरातपेक्षा बीड जिल्हा भारी ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरातपेक्षा बीड जिल्ह्याच्या तब्बल १३९ पट शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब आदी राज्यांचा या मोहिमेत समावेश आहे. या योजनेत बीड जिल्ह्यातील तीन लाख ६९ हजार ९३३ शेतकऱ्यांच्या महसुली माहितीची पडताळणी पूर्ण झाली आहे, तर गुजरात राज्याची ही स्थिती केवळ २६४७ आहे. विशेष म्हणजे ऊसतोड मजुरांचे सर्वाधिक स्थलांतर होणारा हा जिल्हा असून, पंधरवड्यापासूनच मजुरांचे स्थलांतर होऊनही वेगाने काम करण्यात यंत्रणेला यश आले आहे.
केंद्र शासनाने पथदर्शी प्रकल्प म्हणून 'पीएम किसान सॅच्युरेशन अभियान' हाती घेतले आहे. देशातील पाच राज्यांत प्रत्येकी एकेका जिल्ह्यांमध्ये हाती घेतलेल्या या अभियानात शेतकऱ्यांची शेतजमिनीची माहिती, खात्यांची माहिती याची पडताळणी केली जाणार आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी ईकेवायसी, ईसायनिंग आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यातून शेतकऱ्यांचा एक ओळख क्रमांक तयार करून त्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित माहिती संकलित करून ती
आधारशी जोडली जाणार आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या क्षेत्रात भविष्यात काही बदल झाले तर ते आपोआप या ठिकाणी नोंदविले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्याला प्रत्येकवेळी ईकेवायसी करावी लागणार नाही. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या अभियानासाठी प्रत्येक गावात तलाठी आणि इतर कर्मचारी यांच्यामार्फत हे काम केले जात आहे. यात देशात सर्वाधिक काम बीड जिल्ह्यात झाले आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधानांचे गुजरात सर्वात पिछाडीवर आहे. बीड जिल्ह्यात ३ लाख ६९हजार ९३३ खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून, १ लाख ३ हजार ३७७ खात्यांची ईकेवायसी झाली आहे. तर गुजरातमध्ये निवडलेल्या जिल्ह्यात केवळ २ हजार ६४७ खात्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर, १ हजार ९६९ खात्यांची ईकेवायसी करण्यात आली. उत्तर प्रदेशातदेखील पडताळणी केलेल्या खात्यांची संख्या ८५ हजार २६६ तर एकूण ईकेवायसी केलेल्या खात्यांची संख्या ६२हजार ०९४ आहे.
हरियाणा राज्यात देखील केवळ ६० हजार ३३२ खात्यांची पडताळणी केली असून, ४ लाख ७ हजार २७४ ईकेवायसी पूर्ण झाली आहे. पंजाबमध्येदेखील काम सुमारच आहे. या राज्यात पडताळणी केलेले खाती ८१६९ तर एकूण ईकेवायसी केलेली खाती ६३८८ आहेत.