उद्धव ठाकरे आणि शरद पवार पक्षफुटी्मुळे बेजार झालेत. त्यातच काँग्रेसमधून अशोक चव्हाण तसेच बाबा सिद्दीका, मिलिंद देवरा आणि बसवराज पाटील असे दिग्गज नेते गेल्यामुळे काँग्रेसही अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आता राज्यात प्रकाश आंबेडकरांची गरज भासू लागली आहे. त्यामुळे यापूर्वी आम्हाला आघाडीत घ्या, म्हणून मागे लागलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आता मात्र आक्रमक पावित्रा घेत आपली पोलिटिकल बार्गेनिंग पॉवर वाढवल्याचे दिसून येत आहे. यामुळे निश्चितच भविष्यात प्रकाश आंबेडकरांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे.
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या (Loksabha Election) जागावाटपात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) चक्क 27 जागा मागितल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. पण सध्या आंबेडकरांना दुखावण्याची ही वेळ नाही, हे लक्षात घेता यावर ठाकरे गटाचे आक्रमक आणि फायर ब्रॅड नेते संजय राऊत नरमाईची भूमिका घेताना दिसत आहेत. काँग्रेसने तर या विषयावर हाताची घडी तोंडावर बोट, असे धोरण स्वीकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याकडे सध्या तटस्थपणे पाहत आहे.
आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी स्वतंत्रपणे युती करत प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) 'वंचित'ने महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची कोंडी केली होती. नंतर आम्हालाही महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील 'इंडिया' आघाडीत घ्या, अशी मागणी लावून धरली. ही मागणी करतानाही ते शरद पवार तसेच काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करतच होते.
पण भाजपला राज्यात रोखायचे असेल तर 'वंचित'ला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर ज्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि त्यांच्या तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध होता, त्यांनीच दिल्ली दरबारी प्रकाश आंबेडकरांचे महत्त्व पटवून देत त्यांना सोबत घेण्यासाठी हिरवा कंदील मिळवला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीचा (MVA) भाग झाली आहे, असे जाहीरपणे सांगितले जात असतानाही आंबेडकरांनी मात्र याला कधीही दुजोरा दिला नाही. बैठकांना न बोलावल्यामुळे नाराजी व इतर मुद्दे पुढे करत त्यांनी ताणून धरले. अजूनही जागावाटप अंतिम झाल्याशिवाय आपण महाविकास आघाडीसोबत आहोत की नाही? हे सांगता येणार नाही, असे सांगत त्यांनी संभ्रमावस्था कायम ठेवली आहे. त्यातच काल मुंबईत जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकीत 'वंचित'च्या वतीने राज्यातील 48 पैकी निम्या म्हणजे 27 जागांचा प्रस्ताव देत आघाडीतील नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे.
यात ज्या जागांवर तडजोड होऊ शकते अशा आणि ज्यावर तोडगाच निघू शकत नाही अशा मतदारसंघाचाही समावेश असल्याचे 'वंचित'च्या पदाधिकाऱ्याने माध्यमांकडे स्पष्ट केले. एकूणच महाविकास आघाडीतील सहभागाविषयी अजूनही प्रकाश आंबेडकरांची भूमिका तळ्यात मळ्यातच दिसते.
'वंचित'चा 27 जागांचा प्रस्ताव पाहता प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीचा भाग व्हायचं की मग त्यात बिघाडी करायची आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अर्थात घोडा मैदान समोर आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्यात असल्याचे बोलले जाते. यात 'वंचित'च्या टप्प्यात किती जागा येतात? त्या त्यांना मान्य होणार का? यावरच 'वंचित'चा महाविकास आघाडीतील समावेश ठरणार आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.