Latur Administrative News : उमरी (जि. नांदेड) येथून रेणापूर येथे बदली झालेले तहसीलदार प्रशांत थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभाप्रसंगी तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीवर बसून गाणे सादर केले होते. त्यामुळे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी थोरात यांना निलंबित केले आहे. विशेष म्हणजे थोरात यांनी रेणापूर येथे तहसीलदार म्हणून केवळ 12 दिवस काम पाहीले आहे.
तहसीलदार प्रशांत थोरात यांचा उमरी येथील निरोप समारंभाच्या कार्यक्रमातील गाणे म्हणतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबत तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्याने महसुलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली असून, ही बाब गंभीर आहे. (Collector) जिल्हाधिकारी, नांदेड यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
प्रत्येक शासकीय अधिकार्याने आपण त्या पदावर असताना पदाची गरिमा, वेळ, स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक आहे. (Latur) शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या, मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे. कौटुंबिक किंवा खासगी समारंभात अशा सादरीकरणास मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तणुकीची मर्यादा पाळणे अपेक्षित आहे.
सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जपावी, ही अपेक्षा आहे. असे विभागीय आयुक्तांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे. प्रशांत विश्वासराव थोरात यांच्या बदली निमित्त 8 आॅगस्ट रोजी तहसील कार्यालय, उमरीकडून आयोजित निरोप समारंभाच्या वेळी प्रशांत थोरात यांनी तहसिलदार, उमरी यांच्या खुर्चीत बसून गाणे गायले. याचे व्हीडीओ बाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामान्य नागरिक व राजकीय पक्षांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया निदर्शनास आल्या आहेत.
थोरात तहसिलदार यांच्या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. असा अहवाल जिल्हाधिकारी नांदेड यांनी सादर केला आहे. यावरून प्रशांत थोरात यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम, 1979 चे नियम 3 (1) (तीन) चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रशांत थोरात, तहसिलदार यांचेविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची शिफारस केली आहे. त्याअर्थी, जिल्हाधिकारी नांदेड यांचे अहवालवरुन तसेच त्यांच्या या कृतीचा व्हीडीओ हा समाजमाध्यमावर मोठया प्रमाणात व्हायरल झालेला असून त्याचे अवलोकन केले असता, त्यामध्ये ते विविध प्रकारचे अंगविक्षेप हातवारे करत असल्याचे दिसून येत आहे.
प्रशांत थोरात, तहसिलदार यांनी शासकीय कर्मचा-याला अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचे निदर्शनास आल्याने शासनाची प्रतिमा जनमानसात मलीनझाली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच त्यांची सदरची वर्तणूक ही अत्यंत बेजबाबदार व शासकीय अधिका-यास अशोभनीय असल्याचे स्पष्ट होते. त्याकारणाने शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे योजिले आहे. त्या अर्थी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 चे नियम 4 (1) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून प्रशांत थोरात, तहसीलदार, रेणापूर, जि.लातूर यांना या आदेशाच्या दिनांकापासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.