Nanded News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माझ्या पराभवामुळे केंद्रात अशोक चव्हाण यांना मंत्रिपद मिळाले नाही, असे वक्तव्य माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी करीत पराभवाचे खापर महायुतीच्या कार्यकर्त्यांवर फोडले होते. मात्र, त्यानंतर चिखलीकर यांनी या वक्तव्यावरून २४ तासातच युटर्न घेतला.
नांदेड लोकसभा मतदारसंघात माझा पराभव झाला असला तरी जिल्ह्यात नाचक्की भाजप आणि माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची झाली, अशा शब्दांत भाजपचे (Bjp) माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या पराभवाचे खापर महायुतीच्या कार्यकर्त्यांवर फोडले. माझ्या पराभवामुळे केंद्रात अशोक चव्हाण यांना मंत्रिपद मिळाले नाही, असे माजी खासदार चिखलीकर शनिवारी म्हणाले होते. (Pratap Patil Chikhlikar News)
नांदेड लोकसभा भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील-चिखलीकर (Pratap Chikhlikar) यांनी पराभवानंतर नांदेड लोकसभेत आभार दौरा केला, या दौऱ्यानंतर त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला असून ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझ्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न केले, अशोक चव्हाण भाजपमध्ये आले. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. मी कुठेतरी कमी पडलो म्हणून पराभव झाला, असे चिखलीकर यांनी स्पष्ट केले.
मी कुठल्याही प्रसारमाध्यमाला वैयक्तिकरित्या बोललो नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढू नये. मनोज जरांगे फॅक्टर, मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाबाबत झालेला गैरसमज याचा फटका मला या लोकसभा निवडणुकीत बसला असल्याचे चिखलीकर म्हणाले.
विधानसभेला पुन्हा ह्या चुका होऊ नये
भारतीय जनता पक्षाने पक्ष निरीक्षक म्हणून सगळ्याच मतदारसंघात निरीक्षक नेमले आहेत. त्या धर्तीवर राधाकृष्ण विखे पाटलांना (Radhkrishn Wikhe) नांदेडची जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभेला पुन्हा ह्या चुका होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले आहे.