

BJP-Shivsena Politics : छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजपाचे माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी त्यांच्या कार्यकाळात शेकडो कोटींची जमीन देण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या काळात घेतलेला हा निर्णय पठाडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रद्द केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची कोट्यवधी रुपये किमतीची जमीन विकासकाला देण्याचा वादग्रस्त ठराव मंगळवारी (ता.18) झालेल्या बैठकीत अखेर रद्द करण्यात आला. दोन वर्षात विकासकाने ठरल्याप्रमाणे कामे केलेली नाही, बाजार समितीला विकासकाकडून प्रतिसाद दिला जात नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यात सभापतींचे मतदान हे निर्णायक ठरले.
बाजार समितीची संचालकांची बैठक मंगळवारी सभापती श्रीराम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सर्व्हे नंबर 12 व 13 मधील कोट्यवधी रुपये किमतीची जमीन विकासकाला देण्याच्या यापूर्वीच्या ठराव चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. यावेळी संचालक अभिजित देशमुख यांनी बैठकीत या वादग्रस्त ठरावाला विरोध केला. त्यानंतर विषयावर चर्चा झाली आणि अखेर ठराव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जुना ठराव रद्द करताना या जागेचा पर्यायी वापर करण्याचाही प्रस्ताव समोर आला. जळगाव रोडलगत व्यावसायिक शॉपिंग सेंटर उभारणे आणि मागील बाजूस घाऊक व्यापाऱ्यांसाठी प्लॉट विकसित करण्याचा पर्याय बैठकीत मांडण्यात आला. त्यासाठी वास्तुविशारदांकडून नवीन आराखडे आणि खर्चाचा अंदाज मागविण्याचाही निर्णय घेण्यात आला. अखेर 2 फेब्रुवारी 2024 आणि 24 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर करण्यात आलेले दोन्ही ठराव बहुमताने रद्द करण्यात आले. या निर्णयाची माहिती शासनाला देण्याचाही निर्णय समितीने घेतला.
या विषयावर मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात राधाकिशन पठाडे, गणेश दहीहंडे, कैलास उकर्डे, सुजाता गायके, पूनम बमणे, महेंद्र खोतकर, कन्हैया जैस्वाल, नीलेश शेट्टी, देविदास किर्तीशाही यांचे 9 मतदान बिल्डरच्या तर अभिजित देशमुख, जगन्नाथ काळे, भागचंद ठोंबरे, जनाबाई ठोंबरे, दत्ता उकर्डे, अब्दुल रहीम पठाण, मुरली अण्णा चौधरी, भागीनाथ नवपुते, श्रीराम शेळके यांचे 9 मतदान बिल्डर लॉबीच्या विरोधात पडली. मतदान दोन्ही बाजूने समान पडल्याने सभापती श्रीराम शेळके यांनी पुन्हा एकदा मतदान करण्याच्या अधिकारानुसार बिल्डराच्या विरोधात मतदान केले.
सर्व्हे क्रमांक 12 व 13 मध्ये अधिसूचित शेती नियमित मालाच्या घाऊक व्यवहारासाठी आधुनिक शेतकरी मॉल आणि निवासी सदनिकांच्या उभारणीचा प्रस्ताव 2024 मध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी राधाकिशन पठाडे सभापती होते. हा ठराव मंजूर होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही संबंधित कंपनीकडून कोणताही ठोस पाठपुरावा करण्यात आला नसल्याची बाब बैठकीत उपस्थित करण्यात आली.
दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. बाजार समितीची कोट्यवधीची जागा बिल्डरला देऊ नये, यासाठी दोन वर्षांपासून आमचा विरोध सुरू होता. अखेर या संघर्षाला यश मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची जागा आता बिल्डरच्या हाती नव्हे तर बाजार समितीच्या ताब्यात असणार आहे, असे बाजार समितीचे संचालक अभिजित देशमुख यांनी म्हटले आहे.
हायवे लगत बाजार समितीची ही 500 ते 600 कोटीची जमीन आहे. या ठिकाणी बाजार समितीमार्फतच शेतकरी मॉल उभारावा अशी आमची सुरवातीपासूनची मागणी होती, पण त्यावेळी चुकीचा ठरावा घेण्यात आला, असा आरोप दुसरे संचालक जगन्नाथ काळे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.