

Maratha Reservation News : हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा समाजातील नोंदी आढळलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे काम सुरू आहे. मराठा आरक्षण उपसमिती स्थापन होण्यापूर्वी दोन लाख प्रमाणपत्रांचे वाटप झाले होते. समिती स्थापन झाल्यानंतरही आतापर्यंत 54 हजार प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
उपसमिती स्थापन झाल्यापासून आम्ही केलेल्या कामाचा संपूर्ण अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालयाची आवश्यकता नाही, अशी स्पष्ट भूमिका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली. मनोज जरांगे पाटील यांच्या मनात काही तरी गैरसमज झालेले आहेत, ते आम्ही दूर करू.
मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष मीच असावे, असा माझा आग्रह नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याच्या केलेल्या मागणीवरही विखे पाटील यांनी भाष्य केले. धाराशीवमध्ये बोलताना काल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
विखे पाटील यांनी अध्यक्षपदावर असताना नाव घालवले, आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. परंतु त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजातील नोंदी आढळलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. नोंदी शोधल्या जात नाहीयेत, प्रमाणपत्रांना वैधता दिली जात नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी काल केला होता.
तसेच विखे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली होती. एवढेच नाही तर मराठा समाजाचे प्रश्न सोडवून त्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावली.
माझ्या अध्यक्षतेखालील उपसमिती आपले काम करत आहे. आतापर्यंत 54 हजार मराठा समाज बांधवांना कुणबी दाखले देण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल आम्ही गेल्या आठवड्यातच मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवला आहे. त्यांच्या मनात कोणी तरी माझ्याबद्दल गैरसमज पसरवत आहे. मी स्वतः त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहे.
मी यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांना सांगीतले होते की त्यांनी मराठा लोकप्रतिनिधी आमदार, खासदारांना देखील कुणबी नोंदी शोधण्याच्या व त्यांना दाखले मिळवून देण्याचा कामासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे, असे सांगीतले आहे. केवळ निवडणुकीच्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राहून त्यांना मराठा समाजाची मतं मिळवायची आहेत का? मग समाजाच्या या गंभीर प्रश्नासाठी त्यांनी पाठपुरावा करून दाखले मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे, असे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.