Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून नवनिर्माण यात्रा काढली. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांची खास ठाकरी शैलीत तोफ धडधडली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला.
मी मराठवाडा दौरा करीत असताना माझ्या दौऱ्यात अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण लक्षात ठेवा माझे मोहोळ उठले ना यांना निवडणुकीत एकही सभा घेता येणार नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. मागे म्हटले होते यांच्याकडे प्रस्थापित आहेत. माझ्याकडे विस्थापित असल्याने माझ्या नादी लागू नका, असा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी दिला.
या दौऱ्यावेळी शिवसेनेचा (Shivsena) जिल्हाप्रमुख आडवा आला होता. त्याला आमच्या पोरांनी मार मार मारले. नशिब पोलीसमध्ये पडले. तो ओरडत होता एक मराठा लाख मराठा, म्हणजे काय. त्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचे माणसं आहेत. यांच्याआडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर आले पाहिजे. सर्वांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.
काही जणांना राजकारण करायचे आहे. समाजात तेढ निर्माण करून यांना कोणते राजकारण करायचे आहे. यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. यांना वाटतं आमचे एवढे खासदार निवडून आले. त्या खासदारांवर जाऊ नये. तुमचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल तर तुम्ही राजकारण करताना त्या पद्धतीने बोला. समाजात कशाला भांडण लावत आहात, असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी केला
दरम्यान, मनोज जरांगेच्या पाठीमागून राजकारण केले जात आहे. सध्याचा माझ्या दौऱ्याचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीच संबंध नाही. पण हा वाद शरद पवार व उद्धव ठाकरे निर्माण करीत आहेत. त्याशिवाय या मागे काही पत्रकार देखील आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केला.