Beed Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच बीडमध्ये राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. राजाभाऊ मुंडे हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून त्यांच्यासोबत होते. पुढे पंकजा मुंडे यांनाही राजाभाऊ- बाबरी या पिता-पुत्रांनी साथ दिली. परंतु विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ मुंडे यांनी माजलगावमधून अपक्ष निवडणूक लढवली आणि पकंजा मुंडे यांच्यासोबतचे त्यांचे संबंध बिघडले.
विशेष म्हणजे ज्या प्रकाश सोळके यांच्याविरोधात राजाभाऊ यांनी निवडणूक लढवली, आता त्यांच्याच नेतृत्वात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. धनंजय मुंडे-पंकजा मुंडे या बहिण भावासाठी विशेषतः पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर पंकजा यांनी थोडक्यात प्रतिक्रिया देत विधानसभा निवडणुकीतच राजाभाऊ, बाबरी मुंडे यांचा विषय संपला. ते ज्यांच्या विरोधात निवडणुक लढले, त्यांना आम्ही निवडून आणले, आता ते त्यांच्याच सोबत गेले. त्यामुळे आम्हाला याचा काही धक्का वगैरे काही नाही, अशा शब्दात पंकजा यांनी हा विषय उडवून लावला.
पंकजा मुंडे यांच नाव घेतलं की बातमी होते, म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जातात, असेही त्या म्हणाल्या. मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत राजाभाऊ, बाबरी मुंडे हे एकनिष्ठ होते. वडवणी, धारूर तालुक्यात यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पंकजा मुंडे यांना फटका बसेल, असे बोलले जात होते. (Beed News) मात्र अशी कुठलीही शक्यता नसल्याचे पकंजा यांनी स्पष्ट केले.
राजाभाऊ मुंडे व बाबरी मुंडे यांचा विषय विधानसभा निवडणुकीवेळीच संपला होता. त्यांनी ज्यांच्या विरोधात माजलगाव मतदारसंघात निवडणूक लढवली आणि आम्ही माजलगावमध्ये ज्यांना निवडून आणले त्यांच्याकडे हे दोघे आता गेले आहेत. त्यामुळे हा विषय आता नव्याने नाही. परंतु पंकजा मुंडे यांचे नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात. या विषयात पंकजा मुंडेंना धक्का वगैरे असं काही नाही, असे सांगत पंकजा यांनी या विषयाला आपण फार महत्व देत नसल्याचे सांगीतले.
वैद्यनाथ बँकेवर वर्चस्व कोणाचे?
दरम्यान, परळी येथील वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 पैकी चार जागा बिनविरोध आल्याने उर्वरित 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. पंकजा, धनंजय मुंडे यांच्यासह प्रीतम, प्रज्ञा मुंडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 43 हजार 962 सभासद असलेल्या या बँकेवर मुंडे-बहिण भावाचे वर्चस्व आहे. 108 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लगाली आहे. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत आमचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या विजयासाठी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलो होतो. लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होत आहे. त्यावर आमचा विश्वास आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.