BJP Political News : लोकसभा निवडणुकीत जनतेने मला नाकारले, आता पक्षाकडे काही मागणार नाही असं जाहीरपणे सांगणाऱ्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हे विधान पक्षाने चांगलेच गांभीर्याने घेतले.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवायच्या दोन जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केले. एक जागा अजित पवार गटाला देत नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, तर दुसऱ्या जागेसाठी शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील पाटील यांची वर्णी लावण्यात आली.
यातून भाजपने राज्यसभेवर उमेदवारी देण्याचा ट्रेंड बदलला असेच म्हणावे लागेल. केवळ राजकीय पुनर्वसन करण्यासाठी राज्यसभेची जागा असा समज पसरू नये, याची काळजी आणि मित्र पक्षांना दिलेला शब्द आम्ही पाळतो हा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी केल्याचे दिसते. राज्यसभेवर संधी मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या (Raosaheb Danve) रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांमध्ये मात्र आता नाराजी पसरली आहे.
खरतंर रावसाहेब दानवे यांच्यासारखा अनुभवी आणि प्रदीर्घ काळ आमदार, खासदार, केंद्रात राज्यमंत्री, राज्यात प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या दानवे यांना संधी मिळेल, असे वाटत होते. पण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात झालेल्या राजकीय घडामोडी, त्यातून सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिलेले आश्वासन या सगळ्याचा परिणाम काल जाहीर झालेल्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावरून दिसून आला.
सातारा लोकसभेची जागा भाजपने (BJP) राष्ट्रवादीकडून सोडवून घेतली होती. तिथे उदयनराजे भोसले निवडून आल्यानंतर त्या रिक्त जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जाईल, असा शब्द भाजपने अजित पवारांना दिला होता.
त्यानूसार नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी देण्यात आल्याचे सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या बीड मतदारसंघातून पराभूत झालेल्या राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे यांना संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले.
रावसाहेब दानवे हे मराठवाडा आणि राज्यातील भाजपचे बडे नेते म्हणून ओळखले जातात. मराठा आरक्षणाच्या मुद्याचा फटका जसा पंकजा मुंडे यांना बसला तसा तो लोकसभेच्या जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनाही बसला होती.
त्यामुळे पकंजा मुंडे यांच्याप्रमाणेच रावसाहेब दानवे यांचे पुनर्वसन राज्यसभेवर संधी देऊन केले जाईल, असा अंदाज होता. पण आता ती संधी हुकली आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप दानवे यांच्यावर मोठी संघटनात्मक जबाबदारी टाकू शकतो.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तसेही रावसाहेब दानवे पक्ष कामात सक्रीय आहेत. केवळ मतदारसंघच नाही, तर मराठवाड्यात त्यांनी दौरे करत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा, असे आवाहन केले होते. राज्यसभेवर संधी नाकारत बहुदा पक्षाने त्यांना पुर्णवेळ पक्ष कार्यातच ठेवण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. आता संघटनेत त्यांच्यावर पक्षाचे नेते कोणती जबाबदारी देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.