BJP Leader Raosaheb Danve : मराठवाड्यात भाजपसाठी रावसाहेब दानवेच सबकुछ..

Raosaheb Danve is the face of BJP in Marathwada : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच पक्ष संघटनेच्या कामाला सुरुवात करत दानवे यांनी पराभवाने आपण खचलो नाही, संघटनेत काम करून पक्षाला, खचलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी मराठवाड्याचा दौरा करत असल्याचे तेव्हा सांगितले होते.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Marathwada BJP Political News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि विशेषत: मराठवाड्यात भाजप महायुतीला जोरदार दणका बसला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या विरोधात असलेले वातावरण महाविकास आघाडीच्या फायद्याचे ठरले. मराठवाड्याचा विचार केला असता आठ पैकी सात लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने विजय मिळवला. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदार संघात शिवसेनेचे संदिपान भुमरे हे महायुतीचे एकमेव उमेदवार विजयी झाले.

ही जागा काँग्रेसला दिली असती तर मराठवाड्यात (Marathwada) महायुतीला आम्ही `क्लीन स्वीप` दिला असता असा दावा माजीमंत्री व मराठवाड्यातील काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी नुकताच केला होता. मराठा आरक्षणाच्या वादळात मराठवाड्यातील बडे नेते पालापाचोळा उडावा तसे पराभूत झाले. यात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे या दोन नेत्यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभेला भरून काढण्यासाठी भाजपने आता महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

यातून भाजपमधील मराठी चेहऱ्यावर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी टाकत कमबॅकची तयारी पक्षाने सुरू केली आहे. रावसाहेब दानवे यांची राजकीय कारकीर्द, अनुभव, संघटन कौशल्य, दांडगा जनसंपर्क आणि ग्रामीण शैली पाहता मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा चेहरा पुढे करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे संयोजक पद आणि त्यानंतर आता स्टार प्रचारक म्हणून रावसाहेब दानवे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Raosaheb Danve
Marathwada BJP Political News : मराठवाड्यात भाजपच्या विजयासाठी `या` दोन राज्यातील आमदारांची टीम दाखल..

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) मराठवाड्यात मराठा चेहेरा म्हणून कसे चालतील? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज नेते मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यातून निर्माण झालेल्या विद्यमान सरकारच्या विरोधातील लाटेत वाहून गेले होते. दरम्यान, राज्यातील महायुती सरकारने `लाडकी बहीण` योजनेसह बेरोजगार तरुण, वृद्धांसाठी `वयोश्री` अशा लोकप्रिय योजना निवडणुकीच्या तोंडावर आणत थेट मतदानावरच हात घातला आहे.

`लाडकी बहीण` योजनेचा लाभ राज्यातील कोट्यावधी महिला घेताना दिसत आहेत. योजना काम करत असल्यामुळे महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने राज्यातील आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य नेत्यांचा यात समावेश आहे.

Raosaheb Danve
Raosaheb Danve News : ...तर पवार, ठाकरे, पटोलेंनी लेखी द्यावे ; रावसाहेब दानवेंचे आव्हान..

दानवेंनी केली आघाडीची कोंडी..

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात तापलेले वातावरण पाहता या भागात मतदारांना पुन्हा महायुतीकडे खेचण्यासाठी रावसाहेब दानवे हे प्रमुख नेते असतील असे दिसते. 40 वर्षाचा राजकीय अनुभव असलेले रावसाहेब दानवे अनेकदा आपल्या विधानांमुळे वादातही सापडले आहेत. मात्र मोठ्या खुबीने दानवे यांनी आतापर्यंत या वादातून आपली सहीसलामत सुटका करून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच पक्ष संघटनेच्या कामाला सुरुवात करत दानवे यांनी पराभवाने आपण खचलो नाही, संघटनेत काम करून पक्षाला, खचलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी मराठवाड्याचा दौरा करत असल्याचे तेव्हा सांगितले होते.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात आपल्या शैलीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी रावसाहेब दानवे हे योग्य नेते ठरतील, अशी भाजपमधील वरिष्ठांना आशा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी आणि त्यांचे नेते टार्गेट झाले पाहिजेत, अशी रणनिती भाजपने आखली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणी करत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांची कोंडी केली. पण लोकसभा निवडणुकीत याचा फटका फक्त महायुतीला बसला. आता हा डाव महाविका आघाडीवर उलटवण्यासाठी भाजपचे नेते पुढे सरसावले आहेत.

Raosaheb Danve
BJP Manifesto : काश्मीरमध्ये 'या' दहा योजना भाजपला मिळवून देणार का सत्ता?

यात रावसाहेब दानवे यांनी सर्वप्रथम महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी मनोज जरांगे यांची ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचे लेखी द्यावे. तसेच आपल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख करावा, असे म्हणत थेट आव्हान दिले होते. दानवे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीवर दबाव वाढणार आहे. या शिवाय मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदा केंद्रातील रेल्वे सारखे महत्त्वाचे खाते रावसाहेब दानवे यांच्या रूपाने मराठवाड्याला मिळाले होते.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून जो कार्यकाळ रावसाहेब दानवे यांच्या वाट्याला आला तो त्यांनी मराठवाड्यातील रखडलेले रेल्वे प्रश्न मार्गी लावून त्याला गती देण्यासाठी वापरला. लोकसभेच्या जालना मतदार संघाचे खासदार म्हणून केलेले काम आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी केलेले काम याची सांगड घालत महायुतीने कशी विकास कामे केली हे रावसाहेब दानवे आपल्या खास शैलीत सांगून मतदारांना आकर्षित करू शकतात. लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यात दौरे करून सर्वाधिक संपर्क जर कोणी वाढवला असेल तर तो रावसाहेब दानवे यांनी.

Raosaheb Danve
Mahayuti Politics : फडणवीसांच्या गडातच महायुतीत वाद; भाजपची शिवसेना-राष्ट्रवादीवर कुरघोडी?

त्यांच्या या संपर्काचा लाभ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीच्या विरोधात असलेले वातावरण शांत करण्यासाठी भाजपकडून केला जाणार आहे. राज्याच्या सत्तेत पुन्हा यायचे असेल तर मराठवाड्याची भक्कम साथ मिळायला हवी. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मराठवाड्यातील 25 जागा जिंकल्या होत्या.

2024 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा सुरू असलेला संघर्ष पाहता किमान गेल्यावेळी जिंकलेल्या जागा राखण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाऊ शकतो. यात विधानसभा निवडणुकीचे संयोजक आणि भाजपचे स्टार प्रचारक म्हणून रावसाहेब दानवे यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com