

Shivsena UBT News : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट अर्थात समृद्धी महामार्ग जणू दरोडेखोरांना आंदण दिल्यासारखा झाला आहे. दीड तास वाहन लुटले जाते, प्रवाशांना मारहाण केली जाते आणि वरून चोरटे स्टेपनी लावून देण्याची भाषा करतात.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी इतका सर्रास दरोडा पडत असताना गस्तीवरील पोलीस सुट्टीवर होते का? अशा शब्दात महायुती सरकारवर आगपाखड केली आहे. अशा पद्धतीने लुटीचे प्रकार सुरू असतील, तर समृद्धी महामार्गावरून लोकांनी प्रवास का म्हणून करावा? असा सवालही दानवे यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर येथील एका कुटुंबाला मध्यरात्री घेरून सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना २८ ऑगस्टच्या रात्री सिन्नर तालुक्यातील मलढोण–दुशिंगपूर परिसरात घडली. विशेष म्हणजे, त्याच परिसरात त्याच रात्री आणखी काही वाहनांना लुटण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी, २८ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२ वाजता, छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब कारने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात, समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान, दरोडेखोरांनी रस्त्यावर खिळे किंवा धारदार लोखंडी वस्तू टाकून कारचे टायर पंक्चर केले.
कार थांबल्यानंतर आधीच दबा धरून बसलेल्या सुमारे १० ते १२ जणांच्या टोळीने वाहनाला चारही बाजूंनी घेरले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड आणि दांडके होते. त्यांनी कुटुंबीयांना मारहाण केली आणि वाहनातील लहान मुलांना बाहेर ओढण्याचाही प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
घाबरलेल्या कुटुंबीयांनी दरोडेखोरांच्या तावडीतून सुटण्यासाठी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि रोख रक्कम काढून दिली. या घटनेने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. समृद्धी महामार्गासाठी स्वतंत्र पोलीस बळाची आवश्यकता असताना, स्थानिक पोलीस ठाण्यांच्या जीवावर हा महामार्ग सोडून दिला जात आहे, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.