
BJP-NCP crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यातील वाद काही मिटत नाहीये! ग्रामसेवकाला भर कार्यक्रमात कानाखाली आवाज काढेन, बडतर्फ करेन, चमचेगिरी करायची असेल तर नोकरी सोडून दे, अशी भाषा वापरतानाच मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला होता. त्यावर अर्धवट व्हिडिओ टाकला, असे म्हणत रोहित पवार यांना नेता होण्याची घाई झाली असल्याची टीका मेघना बोर्डीकर यांनी केली होती.
यावर आता रोहित पवार यांनी माजी मंत्री तथा मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांचा पोलीसांना जाहीर सभेतून अश्लील शिवीगाळ करत धमकावत असल्याचा जुना व्हिडिओ पुन्हा 'एक्स'वर पोस्ट केला. मेघना बोर्डीकर आणि रामप्रसाद बोर्डीकर यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत मेघनाताई कार्यक्रमाला गर्दी कमी झाली म्हणून तुमचा इगो दुखावला गेला, असा टोला लगावला आहे. रोहित पवार यांच्या जुना व्हिडिओ नव्याने पोस्ट केल्यामुळे बोर्डीकर-पवार यांच्यातील संघर्ष आणखी भडकणार, एवढे मात्र निश्चित.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 'एक्स' वर पोस्ट करताना आदरणीय मेघनाताई, आपल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ बघितला तर आपण मंत्री असूनही अधिकाऱ्यांकडून आपला इगो दुखावला असल्याचे स्पष्ट दिसून येते. अधिकाऱ्याला कानात मारण्याची भाषा करण्याअगोदर आपण काय बोललात तो व्हिडिओ देखील मी इथं शेअर करतोय, त्यात कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने आणि राजकीय श्रेय मिळत नसल्याने आपला दुखावलेला इगो स्पष्ट दिसतो.
ताई, आपल्याबद्दल आदरच आहे परंतु संवैधानिक पदावर असताना असंवैधानिक कृती करणार असाल तर मात्र ते समर्थनीय नाही. भर सभेत आपल्या कुटुंबियाकडून बंदोबस्तावरील पोलिसांना अत्यंत अश्लाघ्य शिवीगाळ केल्यावर टाळ्या वाजवून दाद देणाऱ्या राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार..!, अशा शब्दात रोहित पवार यांनी मेघना बोर्डीकर यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
परभणी जिल्ह्यातील बोरी गावाच्या कार्यक्रमातील मेघना बोर्डीकर यांचा हा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. यावर मेघना बोर्डीकर यांनी संबंधित ग्रामसेवक गरीब, विधवा महिलांना छळत असल्याचा दावा केला. तसेच रोहित पवारांनी अर्धवट व्हिडिओ शेअर केला सांगत त्यांना नेता होण्याची जास्तच घाई झाल्याची टीका केली होती. यानंतर रोहित पवार यांनी आज पुन्हा मेघना बोर्डीकर व त्यांचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत तुमच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार? असे म्हणत टोला लगावला.
मेघना बोर्डीकर यांनी आपला अर्धवट व्हडिओ व्हायरल केल्याचा आरोप केल्यानंतर रोहित पवार यांनी बोरी येथील कार्यक्रमाचा दुसरा व्हिडिओ देखील पोस्ट केला. यात कार्यक्रमाला गर्दी न झाल्यामुळे मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर नाराज झाल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओत मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला व्यासपीठाच्या समोर बोलावून तुला पगार कोण देतं? ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला सालगड्याचं काम कोणी करायला सांगितलं? गावात घरकुल योजनेचे 1500 लाभार्थी आहेत. मग कार्यक्रमाला सगळेजण का आले नाहीत? असा जाब विचारला.
तू नोकरीत कधी जॉईन झाला, तुझ्या नोकरीचे किती दिवस बाकी आहेत? असं काम केलं तर कानाखाली मारेन. तुझी चमचेगिरी बिलकूल चालणार नाही. तू काय कारभार करतो, ते मला माहिती नाही का? मी सीईओ मॅडमना मुद्दाम आज बोलावून घेतले आहे. याद राख पुन्हा चमचेगिरी केली तर तुला बडतर्फ करुन टाकेन. दुसऱ्याची हमाली करायची असेल तर नोकरी सोडून दे, अशा भाषेत बोर्डीकरांनी संबंधित ग्रामसेवकाला जाहीरपणे धमकावल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.