

Sambhaji Nagar News : 'अवामने तुमको उनकी खिदमत के लिये चुन के दिला है, अवाम मे जाओ, उनके मसले हल करो, रिल के चक्कर मे मत पडो. रिलही बनाने का है, तो तुम्हारी जगा पॉलिटिक्स में नहीं है, तुम पिक्चर मे जाओ', अशा शब्दांत एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या नगरसेवकांना फटकारले होतं. मात्र, ओवेसींचा हा सल्ला नगरसेवकांनी धुडाकवत रिलमधून चमकोगिरी सुरूच ठेवली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमचे 33 अधिक तीन स्वीकृत सदस्य असे एकूण 36 नगरसेवक आहेत. सभागृहात विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नावर सळो की पळो करून सोडणे अपेक्षित आहे. परंतू गेल्या शंभर दिवसात विरोधी पक्ष म्हणून एमआयएम सत्ताधाऱ्यांच्या राजकारणालाचा बळी ठरत आला आहे. एकीकडे सभागृहात पक्षाच्या नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक नाही. तर दुसरीकडे अनाधिकृत अतिक्रमण, निवडणुकीत तिसरे आपत्य लपवले म्हणून या पक्षाच्या नगरसेवकांवर टांगती तलवार कायम आहे.
महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 22 माजी नगरसेवकांची उमेदवारी कापत नव्या, तरुण चेहऱ्यांना पसंती दर्शवली. त्यांच्या या धाडसाचे कौतुकही झाले, पण तरुणांचा अतिउत्साह, रील आणि सोशल मिडियावर झळकण्याची हव्यास यातून पक्ष अनेकदा अडचणीत आला. नगरसेवकांच्या बैठकीत स्वतः इम्तियाज जलील यांनी अशी चमकोगिरीसाठी रील, व्हिडिओ करून ते सोशल मिडियावर टाकू नका, असे आवाहन केले होते.
शहागंज भागात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला हुसकावून लावताना केलेल्या रील आणि व्हिडिओमुळेच प्रशासनाने दहा नगरसेवकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना पद रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावली होती. मात्र, यातून काही नगरसवेक धडा घ्यायला तयार नाहीत.
ओवेसींचा सल्लाही धुडकावला..
गेल्या आठवड्यात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. मतीन पटेलच्या घरावर महापालिकेने चालवलेला बुलडोझर, निदा खान अटक प्रकरण व इतर विषयांवर त्यांनी पक्षाची भूमिका मांडली, एसआरआयबद्दलही त्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले होते. याचवेळी त्यांनी रील बनवून सोशल मिडियावर चमकोगिरी करणाऱ्या नगरसेवकांना फटकारले होते.
रीलच बनवायची असले तर जनतेसाठी केलेल्या कामाची करा, उगाच मी घरातून निघालो, गाडीत बसलो अशा रील करू नका, तेच करायचे असले तर चित्रपटात जा, तुमची जागा राजकारणात नाही, अशी ताकीद दिली होती. पण याचा परिणाम काही नगरसेवकांवर झालेलाच दिसत नाही. स्वत: विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर हेच रील बनवण्यात आघाडीवर असल्यामुळे इतरांबद्दल बोलणेच नको, अशी परिस्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.