रावसाहेब दानवेंनी पहिल्यांदाच उघडपणे सांगितलं की संजना जाधव आमदार कशा बनल्या आणि त्या निर्णयामागे कोणत्या नेत्यांची भूमिका होती.
दानवेंच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
संजना जाधव यांच्या आमदारकीमागचं गुपित आता सर्वांसमोर आल्यानं, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे.
तुषार पाटील
BJP Political News : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या कन्या आणि कन्नडच्या विद्यमान आमदार संजना जाधव यांच्या आमदारकीचे रहस्य उलगडून सांगितले. भोकरदन येथे आमदार संतोष दानवे यांच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाच्या खुमासदार आणि फटकेबाजी करणाऱ्या भाषणात हा किस्सा कार्यकर्त्यांसमोर सांगितला. स्वतः रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास हा गावचे सरपंच ते केंद्रीय मंत्री असा राहिला आहे. आज त्यांच्या घरातच दोन आमदार आहेत.
संतोष दानवे हे भोकरदनमधून सलग तीनवेळा निवडून आले. तर संजना जाधव या पहिल्यांदाच कन्नड मतदारसंघातून शिवसेनेच्या आमदार आहेत. आमदार संजना जाधव यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले सर्वेक्षण केले होते. तसे कन्नडमध्ये जेव्हा आम्ही ते केले त्यामध्ये संजना जाधव यांचेच नाव पहिल्या क्रमांकावर होते.
मला थेट अजित पवार यांचा फोन आला होता. सर्वेमध्ये संजना जाधव यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, त्यांना आम्हाला तिकीट द्यायचे आहे. त्यावेळी मी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आणि पवारांना सांगितले की, 'महायुतीत जागा कोणाला सुटते, ते बघू आणि मग विचार करू'.
एकनाथ शिंदेंकडून ऑफर
संजना जाधव या आधी शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि कौटुंबिक कारणामुळे मध्यंतरी राजकारणापासून अलिप्त असूनही त्यांचा मतदारसंघात संपर्क, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी असलेली नाळ कायम होती. 'एकनाथ शिंदे यांनी देखील सर्वेक्षणामध्ये संजना यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगत, तिला आम्ही तिकीट देऊ असे सांगितले. मी त्यांना म्हटले की, महायुतीत शिवसेनेच्या वाट्यावर जागा सुटल्यास माझी हरकत नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे, मी जरी भाजपच्या कोर कमिटीचा सदस्य असलो, तरी संजनासाठी भाजपमधून कधीच तिकीट मागितले नाही आणि तिने सुद्धा आग्रह केला नव्हता. अखेरीस, महायुतीच्या जागा वाटपामध्ये कन्नडची जागा शिवसेनेच्या वाट्यावर आली आणि कन्नडच्या जनतेने संजना यांना निवडून दिले व त्या आमदार झाल्या. मी एक मात्र नक्की सांगतो की, संजनाच्या प्रचाराला सुद्धा मी गेलो नाही अथवा तिच्या प्रचारासाठी एकही कार्यकर्ता अथवा कुटुंबातील सदस्य गेला नाही.
तिला तिकीट मिळाले, तिने तिच्या स्वकर्तृत्वावर आमदारकी मिळवली. फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाखातर आणि महायुतीचा धर्म पाळण्यासाठीच आपण एका सभेला हजेरी लावली होती, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमदार नारायण कुचे, अनुराधा चव्हाण, संतोष दानवे, जालन्याचे भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे तसेच संजना जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
संजना जाधव कोण आहेत?
– त्या महाराष्ट्रातील शिवसेनेच्या कन्नड येथील आमदार आहेत.
रावसाहेब दानवेंनी काय खुलासा केला?
– त्यांनी संजना जाधव यांच्या आमदारकीमागे असलेल्या राजकीय चर्चेचा पडदा उघडला.
हा खुलासा कुठे झाला?
– जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे झालेल्या एका कार्यक्रमात रावसाहेब दानवेंनी हे वक्तव्य केलं.
भाजपमध्ये या खुलाशावर प्रतिक्रिया काय आहेत?
– पक्षातील काही नेत्यांनी समर्थन केलं.
या घटनेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
– संजना जाधव यांच्या पुढील राजकीय प्रवासावर आणि भाजपच्या अंतर्गत समीकरणांवर परिणाम दिसू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.