Sanjay Shirsat: सत्तारांना शिरसाटांचा इशारा! एकनाथ शिंदेंच्या भूमिकेशी ठाम राहण्याबाबत स्पष्टच सांगितलं

Marathwada Graduate Constituency: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांची असल्याचे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. अब्दुल सत्तार आणि संजना जाधव यांनाही पक्षाची भूमिका स्वीकारावी लागेल, असे ते म्हणाले.
Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Graduate Constituency: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे पक्षातील आमदारांना ही भूमिका स्वीकारावीच लागेल, असे स्पष्ट मत राज्याचे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. आमदार अब्दुल सत्तार आणि संजना जाधव यांच्या वेगळ्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचेही सांगितले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्यावरून महायुतीतील शिवसेनेमध्ये सुरुवातीला मतभेद निर्माण झाले होते. मात्र, नेत्यांची बैठक झाल्यानंतर हे मतभेद दूर झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना त्यांच्या प्रचारासाठी तन, मन आणि धनाने काम करणार असल्याचे जाहीर केले.

सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेची आधीची भूमिका आणि त्यानंतर घेतलेला निर्णय हे दोन्ही पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेच असल्याचे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

“पक्षाचा प्रवक्ता म्हणून पक्षाची भूमिका मांडणे हे माझे काम आहे आणि ते मी करत असतो. अमरावतीतील बैठकीनंतर युतीतील वाद आणि मतभेद दूर झाले आहेत. मराठवाड्यात शिवसेनेची संपूर्ण ताकद सतीश चव्हाण यांच्या पाठीशी उभी करण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तीच भूमिका मी मांडली,” असे शिरसाट यांनी सांगितले. हा निरोप कदाचित अब्दुल सत्तार आणि संजना जाधव यांच्यापर्यंत पोहोचला नसेल, असेही त्यांनी नमूद केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा न देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती. काही गैरसमजातून ही भूमिका घेण्यात आली होती. युतीच्या नेत्यांची राज्य पातळीवर तसेच अमरावती मध्ये जी चर्चा झाली, त्यानंतर मतभेद मिटले. गैरसमज होते, ते आता दूर झाले, असे सांगत स्वतः सतीश चव्हाण हे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी गेले होते. संयुक्त पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांचे शिवसेना तनमनधनाने काम करणार असे जाहीर केले.

Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Sambhaji Patil Nilangekar : लातूर जिल्हा बँकेत देशमुख कुटुंबाचा आत्मा, शेतकरी..., संभाजी पाटील निलंगेकरांचा जिव्हारी लागणारा वार

परंतु त्यांच्याच पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार, संजना जाधव यांनी पक्षविरोधी भूमिका घेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर पक्षाच्या संपर्क कार्यालयात यासाठी बैठकाही घेतल्या.याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत अब्दुल सत्तार यांना समज देण्यास सांगीतले होते.

या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्या निशाण्यावर असलेल्या पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सतीश चव्हाण यांना पाठिंबा न देण्याचा आधीचा आणि त्यानंतर पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा पक्षाचा, म्हणजे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा होता. पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी तो जाहीर केला, ते माझे कामच आहे. कदाचित हा मेसेज अब्दुल सत्तार, संजना जाधव यांच्यापर्यंत पोहचला नसावा. एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत सत्तार यांच्याशी बोलणे झाले असेल असा माझा अंदाज आहे.

Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Gokul Election : गोकुळच्या निकालात प्रचंड मोठी उलथापालथ : सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीची मुसंडी; शौमिका महाडिकांसह महायुती पिछाडीवर

पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केल्यानंतरही कोणी तिच्या विरोधात काम करत असेल, तर त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. “पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात कोणी जाणार असेल किंवा काम करणार असेल, तर त्याबाबत काय निर्णय घ्यायचा, हा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. ते योग्य ती कारवाई करतील,” असेही त्यांनी सांगितले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांच्या पाठिंब्यावरून शिवसेनेतील मतभेद आता पक्षशिस्तीच्या मुद्द्यावर पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर सत्तार आणि जाधव कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com