Sanjay Shirsat: 'माझा राजीनामा म्हणजे खाऊ वाटला का?' संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिरसाटांचा एकनाथ शिंदेंना इशारा?

Sanjay Shirsat Warning Eknath Shinde: आतापर्यंत प्रत्येक आरोपाला आक्रमकपणे प्रत्युत्तर देणाऱ्या शिरसाट यांनी यावेळी थेट आपल्या राजीनाम्याच्या मागणीवरून संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचे राजकीय अर्थ शोधले जात आहेत.
Sanjay Raut Sanjay Shirsat Eknath Shinde
Sanjay Raut Sanjay Shirsat Eknath Shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News: शिवसेनेतील बंडाच्या वेळी घडलेल्या एका प्रसंगाचा दाखला देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच अडचणीत आणले. त्यावर शिंदे यांनी 'जास्त काम करा आणि कमी बोला,' अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. हा वाद शमतो न शमतो, तोच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्यावर पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर 'माझा राजीनामा म्हणजे खाऊ वाटला का?' असा संतप्त सवाल शिरसाट यांनी केला. शिरसाटांचा हा संताप राऊतांवर असला, तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख एकनाथ शिंदे यांच्याही दिशेने होता का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

गेल्या दीड वर्षापासून संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. घरात सापडलेली कथित पैशांची बॅग, हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरण, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील भूखंड व्यवहार, शाजापूरमधील जमीन खरेदी, सिडकोतील जमीन व्यवहार, सामाजिक न्याय विभागातील निविदा प्रक्रिया आणि आता लातूरमधील अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावावरून शिरसाट विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आतापर्यंत प्रत्येक आरोपाला आक्रमकपणे प्रत्युत्तर देणाऱ्या शिरसाट यांनी यावेळी थेट आपल्या राजीनाम्याच्या मागणीवरून संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचे राजकीय अर्थ शोधले जात आहेत.

शिरसाटांच्या एका विधानाने शिंदेंचीच कोंडी!

एका पॉडकास्टमध्ये शिवसेनेतील बंडाच्या वेळी धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील सुरतहून कसे निसटले, याचा घटनाक्रम संजय शिरसाट सांगत होते. त्यावेळी 'आम्ही रोखले नसते तर त्या आमदाराचा राम नाम सत्य है झाला असता,' असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानाचा आधार घेत विरोधकांनी एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केले. एकनाथ शिंदे हे कैलास पाटील यांचा 'राम नाम सत्य है' करणार होते का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. तसेच एकनाथ शिंदे सत्तेसाठी कोणत्या थराला गेले होते, असा मेसेज महाराष्ट्रात गेला. शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतील बंडाचा विषय पुन्हा चर्चेत आला.

या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी 'मी नेहमीच सांगत असतो, जास्त ऐका आणि कमी बोला. जास्त काम करा आणि कमी बोला,' असे म्हटले. त्याचवेळी शिरसाट नेमके काय बोलले, हे आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिरसाट हे केवळ शिवसेनेचे मंत्री नाहीत, तर पक्षाचे राज्य प्रवक्तेही आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला पक्षाच्या दृष्टीनेही महत्त्व असते. अशा परिस्थितीत शिंदे यांनी कमी बोलण्याचा दिलेला सल्ला आणि त्यानंतर शिरसाट यांनी राजीनाम्याच्या मागणीवर व्यक्त केलेला संताप, या दोन घडामोडींमुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

राऊतांनी राजीनामा मागितला; शिरसाटांनी उपस्थित केला जातीचा मुद्दा

लातूरमधील अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राचा २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संजय शिरसाट यांनी २० टक्के म्हणजेच पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप खासदार संजय राऊत आणि तक्रारदार नरसिंग उदगीरकर यांनी केला आहे. या आरोपानंतर एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली. राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिरसाट यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात, आपल्याकडे नाहीत, असे सांगत त्यांनी राऊत यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले.

त्याचवेळी शिरसाट यांनी जातीचाही मुद्दा उपस्थित केला. अण्णाभाऊ साठे यांचे नाव लेटरहेडवर लावून या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला माझी जात खुपते आहे का? तुमच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये आणि त्याआधी १९९५ मध्ये सत्ता आली, तेव्हाच्या मंत्रिमंडळात दलित समाजातील कोणाला मंत्री केले होते, त्याचे नाव सांगा, असे आव्हान शिरसाट यांनी दिले. राऊत यांच्या आरोपांवर आणि राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी दलित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे हा वाद आता केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही.

Sanjay Raut Sanjay Shirsat Eknath Shinde
Mohite Patil : मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप : ‘सांगोल्यात बोगस मतदान, कोऱ्या मतपत्रिका केंद्राबाहेर नेऊन शिक्के मारून पुन्हा केंद्रात आणल्या...’

राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदेंना इशारा?

'माझा राजीनामा म्हणजे खाऊ वाटला का?' हे शिरसाट यांचे विधान राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरत आहे. कारण राजीनाम्याची मागणी संजय राऊत यांनी केली असली, तरी शिरसाट यांच्या मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्यात शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची राजकीय भूमिका महत्त्वाची असणार आहे. आपले मंत्रिपद सहजासहजी काढून घेतले जाऊ शकत नाही, असे शिरसाट यांना आपल्या वक्तव्यातून सुचवायचे आहे का? राजीनाम्याच्या मागणीपुढे पक्षनेतृत्वानेही झुकू नये, मी मंत्रिमंडळातील एकमेव दलित मंत्री आहे, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांना द्यायचा आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जातीचा मुद्दा उपस्थित करण्यामागे काय राजकीय गणित?

शिरसाट यांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना दलित समाजाच्या मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या या भूमिकेला दोन संदर्भ आहेत. एक म्हणजे ठाकरे गटाला प्रत्युत्तर देताना त्याच्या सत्ताकाळातील सामाजिक प्रतिनिधित्वावर प्रश्न उपस्थित करणे. दुसरा म्हणजे आपल्या मंत्रिपदाकडे केवळ वैयक्तिक राजकीय संधी म्हणून न पाहता सामाजिक प्रतिनिधित्वाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा आग्रह धरणे.

Sanjay Raut Sanjay Shirsat Eknath Shinde
Pune firing news : पुण्यातील गोळीबारानंतर CM फडणवीस संतापले; पोलिस महासंचालकांकडे व्यक्त केली नाराजी, पुणे पोलिस दलात मोठ्या फेरबदलांची शक्यता!

शिरसाट यांच्यावरील आरोपांची चौकशी आणि दलित समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व हे वस्तुतः दोन स्वतंत्र विषय आहेत. मात्र, त्यांनी आपल्या प्रत्युत्तरात हे दोन्ही मुद्दे एकत्र आणले आहेत. भविष्यात शिरसाट यांच्या मंत्रिपदाबाबत पक्षांतर्गत चर्चा झाली, तर त्यांनी उपस्थित केलेल्या सामाजिक प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यालाही राजकीय महत्त्व प्राप्त होऊ शकते. त्यामुळे राऊतांना उत्तर देताना शिरसाट यांनी पक्षनेतृत्वासमोरही अप्रत्यक्षपणे आपली बाजू मांडली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.