

Beed Politics News : मस्साजोगचे माजी सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आरोपींनी ज्या प्रकारे हत्या करण्यापुर्वी संतोष देशमुख यांचा छळ केला, त्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्र पाहून प्रत्येकाचे मन सुन्न झाले होते. या हत्येच्या विरोधात बीड जिल्हा आणि राज्यभरात संताप पसरला होता. देशमुख कुटुंबियांबद्दल सर्वत्र सहानुभूती होती.
आई शारदाबाई, पत्नी अश्विनी, मुलगी वैभवी, भाऊ धनंजय देशमुख या सर्वांबद्दल केवळ मस्साजोगच नाही तर बीड जिल्हा, महाराष्ट्रात कमालीची सहानुभूती निर्माण झाली होती. आरोपींना फाशीची शिक्षा आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात न्याय मोर्चे निघाले. या प्रकरणातील एक फरार आरोपी वगळता इतर सर्व अटकेत आहेत. बीडच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. अशातच मस्साजोगच्या सरपंच पदाची निवडणूक पार पडली आणि धक्कादायक निकाल लागला.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले, पण गेल्या निवडणुकीत 9 मतांनी तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांच्याविरोधात पराभूत झालेले स्वरुपानंद देशमुख मैदानात उतरले आणि चित्र पालटले. महाराष्ट्राची सहानुभूती असलेल्या देशमुख कुटुंबाच्या विरोधात मस्साजोगकरांनीच कौल का दिला? याबद्दल अनेक तर्क लढवले जात आहेत.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील हे अठ्ठावीसशे मतदार असलेले गाव एका हत्या प्रकरणाने देशपातळीवर पोहचले. त्यामुळे सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. निकाल लागून तीन दिवस उलटून गेले, पण सर्वसामान्यांना अजूनही अश्विनी देशमुख यांचा मस्साजोगवासियांनी पराभव केला यावर विश्वास बसत नाही. नेमक असं का घडलं? याबाबत काही समोर न आलेल्या गोष्टींची चर्चा आता होऊ लागली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, आष्टीचे आमदार सुरेश धस, बीडचे संदीप क्षीरसागर यांनी आरोपींच्या अटकेसाठी तसेच त्यांना फासावर चढवण्यापर्यंत लढा देण्याची घोषणा केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घालून देशमुख कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची भूमिका घेतली.
खासदार सोनवणे यांचा केज तालुक्यात असलेला प्रभाव लक्षात घेता त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार होती. थेट सहभाग न घेता त्यांनी पडद्यामागून सुत्रं हलवल्याची चर्चा आहे. परंतु त्यांच्याच काही समर्थकांनी आश्विनी देशमुख यांच्याऐवजी स्वरुपानंद देशमुख यांना मदत केल्याचा आरोप केला जात आहे. मसस्साजोगमध्ये मतदान सुरू असताना बजरंग सोनवणे हे दुपारी गावातील बसस्थानकावर उपस्थित होते. या दरम्यान, त्यांनी काय संदेश दिला? याबद्दलही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांचा या निवडणुकीत थेट हस्तक्षेप नव्हता. पण त्यांनी आपले निरोप गावातील प्रमुख लोकांपर्यंत पोहचवले होते, अशीही चर्चा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आग्रही असलेले हे दोन्ही लोकप्रतिनिधी गावगाड्याच्या राजकारणापासून लांब राहिले.
धनंजय देशमुख हे गावातील राजकारणात कायम सक्रीय राहिले आहेत. संतोष देशमुख सरपंच असतानाही गावच्या कारभारात धनंजय देशमुख यांचा सहभाग असायचा. त्यांनी अनेक निवडणुका पाहिल्या, त्यातील यंत्रणा राबवण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. परंतु गेल्या एक दीड वर्षापासून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी, आणि संतोष देशमुख त्यांचे कुटुंब आणि मस्साजोगकरांना न्याय मिळावा यासाठी त्यांना न्यायालयीन लढा द्या लागत आहे.
यासाठी मुंबई, बीडसह राज्यभरात त्यांना अनेक दौरे करावे लागले. दरम्यानच्या काळात त्यांचा गाव आणि गावातील मंडळींशी संपर्क कमी झाला. बाहेरच्या लोकांचा गावातील राजकारणात हस्तक्षेप वाढला हे काही जणांना खटकणारे होते. याचा फटका अश्विनी देशमुख यांना बसला.
सरपंच पदाच्या पोटनिवडणुकी दरम्यान, बीड कारागृहातील वाल्मिक कराडच्या गुंडांकडून अझहर पठाण नावाच्या कैद्याला झालेली मारहाण, त्याचा व्हायरल झालेला आॅडिओ याचाही परिणाम निवडणुकीत झाल्याचे बोलले जाते. मारहाण झाल्याचा दावा करणारा आॅडिओ आपल्याला धनंजय देशमुख यांचे साडू यांनी दबाव आणून करायला लावला.
वाल्मिक कराडला बदनाम करायचे आहे, मस्साजोगच्या सरपंच पदाची निवडणूक होईपर्यंत हे करायचे आहे, असा खुलासा करणारा दुसरा ऑडिओ अझहर पठाणने व्हायरल केला. या आॅडओ क्लीपचा थेट संबंध मस्साजोगच्या निवडणुकीशी जोडला गेला, या सगळ्या संशयास्पद गोष्टींमुळे गावात दोन गट पडले होते. मतदानाच्या दिवशी यातून दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली होती. त्या शेवट धक्कादायक निकालात झाला.
मस्साजोग सरपंचपदाची निवडणूक आपण बिनविरोध करू, हा अतिआत्मविश्वास धनंजय देशमुख यांना नडला. स्वरुपानंद देशमुख, संजीवनी देशमुख या विरोधकांनी आम्हाला न विचारता, बाहेरच्या लोकांचा दबाव आणून निवडणूक बिनविरोध होऊ शकत नाही, अशी भूमिका घेतली. आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही माघार घेतली असती, असे सांगत या प्रक्रियेत धनंजय देशमुख यांना टारगेट केले.
अश्विनी देशमुख यांची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, पण त्यांच्या आडून कोणाला तरी राजकारण करायचे आहे? असे विधान करत स्वरुपानंद यांनी आपला इशारा धनंजय देशमुख यांच्याकडे असल्याचे दाखवून दिले होते. या सगळ्या घडामोडी आणि घटनाक्रमांकडे गावातील मतदार पाहत होते. पण यावर मतपेटीतून उत्तर देण्याचे त्यांनी ठरवले होते, पुढे घडलेही तसेच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.