मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझी जिरेवाडीतील तीन कोटींची जमीन हडपली. यामध्ये पंकजा मुंडे यांचाही हात आहे, असा खळबळजनक आरोप सारंगी महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांच्या घरातील नोकराच्या नावावर ही जमीन आहे. कोऱ्या बाॅन्ड पेपरवर धमकावून माझ्या सह्या घेण्यात आल्या होत्या. सह्या केल्या नाही तर परळीतून बाहेर जाऊ देणार नाही, असा दम देऊन सह्या घेतलेल्या बाॅडच्या आधारे या जमीनीची रजिस्ट्री धनंजय मुंडे यांच्या माणसांनी करून घेतली.
तीन कोटी रुपयांची जमीन लाखात हडपली. गोविंद बालाजी मुंडे हा नोकर, त्याची सून व इतरांची नावे देखील सातबाऱ्यावर चढवण्यात आल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. या संदर्भात आॅक्टोबर 2024 मध्ये आपण औरंगाबादच्या हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आपण भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. यातून मार्ग काढून तुम्हाला मदत करतो, असे आश्वासन अजित पवारांनी आपल्याला दिल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले.
तसेच थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण त्यांनाही हा प्रकार सांगून न्याय मागणार आहोत, असे महाजन यांनी सांगितले. पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या नात्याने मामी लागणाऱ्या सारंगी महाजन यांच्या या नव्या आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. तर पकंजा मुंडे यांचेही नाव जमीन हडप केल्याप्रकरणी सारंगी महाजन यांनी घेतल्याने त्यांचीही डोकेदुखी वाढणार आहे.
प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि त्यांची लोक सर्रास जमीन हडप करतात, नाही दिली की धमक्या देतात. अशाप्रकारे अर्धी परळी ही धनंजय मुंडे यांची असेल, असा आरोप केला आहे. वाल्मिक कराड याला आपण कधी प्रत्यक्ष भेटलेलो नाही, परंतु या जमीन प्रकरणात त्याचीच माणसे असू शकतात. कारण धनंजय मुंडे वाल्मिक कराडला सांगतो आणि तो खालच्या लोकांना, असा दावाही महाजन यांनी केला.
साडेतीन कोटींची जमीन ही धमकी देऊन फक्त 21 लाखांत घेतली. परळीत बोलवून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, सही केल्याशिवाय परळीतून बाहेर जाऊ देणार नाही, अशी धमकीच धनंजय मुंडे यांच्या माणसांनी आम्हाला दिल्या होत्या. धनंजय मुंडे यांचा नोकर गोविंद मुंडे याने धाक दाखवून जमिनीची रजिस्ट्री करुन घेतली. कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि नंतर इसार पावती मला पाठवली. धनंजय मुंडे यांच्या घरी नोकर असलेल्या गोविंद मुंडे यांच्या नावावर ही जमीन असल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. साडेतीन कोटी रुपयांची जमीन फक्त 21 लाखात घेतली. तीन दिवसांत सातबाराही त्यांनी बदलला. ती जमीन गोविंद मुंडे, त्याची सून आणि दशरथ साठे यांच्या नावावर आहे.
या प्रकरणात धनंजय मुंडेच असेल असे मला आधी वाटले नव्हते. पण मी या प्रकरणात मदतीसाठी जेव्हा धनंजय मुंडे यांना भेटले तेव्हा त्यांनी टाळाटाळ केली. मामी, तुम्ही परस्पर जमीन विकायला नको होती, परळीत कोणीही जमीन विकली तर मला लगेच समजते. मी परळीचा किंग आहे. मामी तुझा फॉलोअप कमी पडला असे म्हणत त्यांनी टाळाटाळ केली. तेव्हाच माझ्या लक्षात आले की मी चोराकडेच मदत मागते आहे, असेही सारंगी महाजन म्हणाल्या. यामध्ये पंकजा मुंडे यांचाही हात आहे, असे सांरगी महाजन यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.