Marathwada News : भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त जमातीचा पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या याने गावातील एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. भाजपाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक म्हणून भोसले ओळखला जातो. स्वतः धस यांनीही भोसले माझा कार्यकर्ता असल्याची कबुली दिली. यानंतर आता भोसले यांच्या अटकेची मागणी करत शिरुर पोलीस ठाण्यासमोर लोकांचा मोठा जमाव जमल्यामुळे वातावरण तापले आहे.
सतीश भोसलेला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलीस स्टेशनसमोर जमलेला जमाव करत आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. मस्साोजगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या, या प्रकणातील आरोपींनी संतोष देशमुख यांचा केलेला अमानूष छळ व त्याची छायाचित्रे बाहेर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली.
या खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि त्याला पाठीशी घालण्याचा आरोप असलेले धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण गंभीर वळणावर असतानाच आता पुन्हा एकदा बीड (Beed News) जिल्ह्यातील आणखी एक अमानूष मारहाणीचा प्रकार उघडकीस आला. मारहाण करणारा भोसले नावाचा भाजप पदाधिकारी हा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय निघाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.
सरपंच संतोष देशमुख प्रकरणात रान पेटवून आरोपींच्या अटकेपासून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यापर्यंत आमदार धस यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या रेट्यामुळेच धनंजय मुंडे यांचाही राजीनामा झाला. मात्र आता त्यांचाच कार्यकर्ता सतीश भोसले एका तरुणाला बॅटने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ बाहेर आला. यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात वादळी चर्चा सुरू झाली. सतीश भोसले यांच्या करारनाम्याचे वेगवेगळे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याला तात्काळ अटक करावी, तसेच ज्या आमदार सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून तो ओळखला जातो, त्या सुरेश धस यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिरुर पोलीस ठाण्याबाहेर गावकऱ्यांची मोठी गर्दी जमल्याची माहिती आहे. बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीदारांसह ही मारहाण केली.
भाजप आमदार सुरेश धस यांचा तो निकटवर्तीय आहे. यानंतर सतीश भोसलेवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याने गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केली होती. या मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे आठ दात पडले तर महेश ढाकणे याचा पाय फ्रॅक्चर झाला. ढाकणे कुटुंब त्या अवस्थेत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते. मात्र तेव्हा गुन्हा दाखल झाला नाही.
आता हे प्रकरण राज्य पातळीवर जाऊन थेट विधीमंडळात यावर चर्चा होऊ लागली तेव्हा आज पोलिसांनीच फिर्यादी होत या प्रकरणात सतीश भोसले याच्या विरोधात गुन्हा नोंद केला. आता त्याच्या अटकेसाठी पोलीसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, बावी गावातील नागरीक आणि ढाकणे कुटुंबातील सदस्यांनी शिरूर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे. जोपर्यंत सतीश भोसले आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.