Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवाट योजनेसाठी राज्य शासनाने पावणेतीन हजार कोटींची योजना दिली. पण महापालिकेकडे 822 कोटींचा हिस्सा भरण्यासाठी पैसे नाहीत. आधीच शहराची पाणीपुरवठा योजना रखडली, त्यात आता महापालिकेची आर्थिक स्थिती 822 कोटी भरण्याची नसल्याने या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेचा हिस्साही राज्य सरकारने भरावा, अशी मागणी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीही महापालिकेच्या वाट्याचा हिस्सा सरकारकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नुकतेच दिले होते. शहराच्या पाणी प्रश्नासाठी राष्ट्रवादीनेही(अजित पवार गट) पुढाकार घेतला असून, आमदार सतीश चव्हाण यांनी आता थेट अजित पवारांनाच(Ajit Pawar) साकडे घातले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संभाजीनगरकरांना दररोज मुबलक पाणी मिळावे, यासाठी ही पाणीपुरवठा योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. महापालिकेची स्वतःचा हिस्सा भरण्याची ऐपत नाही, तेव्हा सरकारनेच 822 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी पत्राद्वारे अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने त्वरित आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा, असं ते म्हणाले आहेत.
राज्य शासनाने 2740 कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात असून डिसेंबर 2024 पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेत केंद्र शासनाचा 25, राज्य शासनाचा 45 तर महापालिकेचा 30 टक्के वाटा आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) महानगरपालिकेला 822 कोटी रूपये भरावे लागणार आहेत.
मात्र महानगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी हिस्सा भरण्याची महापालिकेची ऐपत राहिलेली नाही. परिणामी महापालिकेच्या वाट्याची 30 टक्के म्हणजेच 822 कोटींची रक्कमही राज्य शासनाने भरावी, असे पत्र महानगर पालिकेने शासनाच्या नगर विकास विभागाकडे सादर केले होते. मात्र राज्य शासनाने ही रक्कम देण्यास नकार दिला आहे. महापालिकेचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे अत्यावश्यक कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते.
ही बाब सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देत महापालिका 822 कोटी रूपये कसे भरणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने महानगर पालिकेचा 822 कोटी रूपयांचा हिस्सा भरावा, असे पत्र चव्हाण यांनी अजित पवारांना दिले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात लवकरच आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी चव्हाण यांना दिले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.