
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांचा विधानसभा निवडणुक लढवण्याचा प्रयोग अखेर फसला. विधानसभेच्या गंगापूर-खुल्ताबाद मतदार संघातून भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात चव्हाण यांनी दंड थोपटत त्यांना आव्हान दिले होते. गेल्या सोळा वर्षापासून मराठवाडा पदवीधर मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण यांना विधानसभा लढवण्याचा विचार का बरं आला असेल? याची मोठी रंजक काहणी आहे.
राज्यातील शिक्षक आणि त्यांच्या मुख्यालयी न राहता घरभाडे आणि इतर भत्ते उचलण्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी विधानसभा दणाणून सोडली होती. शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्वक शिक्षण मिळत नाही, यामुळे पिढ्या बरबाद होत आहेत. याकडे पदवीधर, शिक्षक आमदारांचेही लक्ष नाही. ते संस्था आणि संस्थाचालकांना सांभाळण्यात व्यस्त असल्याचा हल्लाबोल बंब यांनी केला होता.
यापुढे जाऊन विधानसभा आणि विधान परिषदेत शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी एवढे आमदार असताना त्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि आमदाराची काय गरज? ते रद्द केले पाहिजे, अशी मागणी बंब यांनी करत राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. (NCP) तेव्हापासून बंब यांच्या मुसक्या आवळण्याची रणनिती राष्ट्रवादीकडून सुरू होती. अगदी राज्यभरात प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षक आणि त्यांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यानंतरही बंब यांनी आपली भूमिका कायम आणि ठाम असल्याचे सांगत शिक्षक, पदवीधर त्यांच्या संघटना आणि या सगळ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना अंगावर घेतले होते.
सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे या जोडीने तेव्हापासूनच बंब यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. पक्षाच्या नेतृत्वाकडून विधानसभेसाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर सतीश चव्हाण गंगापूर मतदारसंघात सक्रीय झाले होते. मोठा निधी या मतदारसंघात खर्च करत दोन वर्षापासून चव्हाण या मतदार संघात काम करत होते. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांसोबत असलेले चव्हाण गंगापूर-खुलताबाद मधून उमेदवारीसाठी शरद पवारांच्या पक्षात गेले.
विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मतदारसंघात त्यांचा आपल्या पाठिंबा मिळाल्याचे चित्र निर्माण करण्यातही चव्हाण यशस्वी ठरले होते. प्रशांत बंब यांच्या प्रत्येक जाहीर सभेत पंधरा वर्षाचा हिशोब मागणारे लोक उभे राहिले. यातून बंब यांचाही संयम ढळला, त्यातून धमकावणे, बघून घेईनची भाषा त्यांच्याकडून झाली. प्रत्यक्ष मतदानात बंब यांना फटका बसणार आणि गंगापूरमध्ये परिवर्तन घडणार असे चित्र निर्माण झाले होते.
परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि विधानसभा यात फरक असतो हे बंब यांनी सलग चौथा विजय मिळवत दाखवून दिले. निवडणूक प्रचारात सतीश चव्हाण यांनी बाजी मारली, पण प्रत्यक्ष मैदानात रणनिती आखून त्यांची योग्य अंमलबजावणी करून घेण्यात बंब यांनी त्यांना मात दिली. गंगापूरची लढत अगदीच एकतर्फी झाली नसली तर ज्या परिस्थितीत बंब यांनी ही जागा राखली, यावरू 'जो जिता वही सिकंदर' हेच खरे ठरले. सतीश चव्हाण यांनी या पराभवातून निश्चितच धडा घेतला असेल. गड्या आपुला गाव बरा प्रमाणे चव्हाण देखील आपला पदवीधर मतदार संघच बरा, असे म्हणत माघारी फिरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.