Beed News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बीड जिल्हा बँकेच्या कर्जासाठी थकहमी मिळाली होती. त्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. पण, आता अमित शाहांच्या केंद्रीय सहकार खात्यामार्फत या कारखान्याला मदत का होत नाही, असा प्रश्न आहे. (Sharad Pawar helps Pankaja Munde's sugar factory; But why no help from Amit Shah?)
केंद्रीय सहकार खात्याच्या ‘एनसीडीसी’मार्फत राज्यातील भाजप नेत्यांच्या सहा कारखान्यांना मदत करण्यात आलेली आहे. तसेच, नुकतीच प्राप्तिकराच्या शेकडो कोटी रुपयांच्या माफीचीही योजना राबविली गेली आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी परळीजवळ उभारलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा एकेकाळी सर्वत्र लौकिक होता. मात्र, मागच्या काही वर्षांपासून दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटल्याने कारखाना नियमित चालू शकला नाही, त्यामुळे कारखाना वरचेवर अडचणीत येत आहे. याला व्यवस्थापनातील दोषही कारणीभूत आहेत. त्यामुळे कारखान्यावर विविध बँकांचे कर्ज थकले असून, कारखान्याच्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसाही येत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी, मुकादमांचे देणेही थकले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही, अशा अनेक संकटांच्या फेऱ्यात कारखाना अडकला आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच्या गाळप हंगामाला कारखान्याने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १६ कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली. या कर्जाला राज्य सरकारची थकहमी आवश्यक होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घालून पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याच्या कर्जाला राज्याची थकहमी मिळवून दिली होती. आता केंद्रात नव्याने सहकार खाते निर्माण होऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या खात्याचे मंत्रिपद आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे वारंवार आपले नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह असल्याचे निक्षून सांगतात. मात्र, शाहांच्या खात्यामार्फत कारखान्यांसाठी राबविलेल्या दोन्ही मदतीच्या योजनांमध्ये पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ कारखाना नाही, हे विशेष. या खात्याने सहकारी साखर कारखान्यांना मदतीसाठी एनसीडीसी महामंडळामार्फत थेट कर्ज योजना हाती घेतली. महामंडळ कारखान्यांना थेट शंभर कोटींहून अधिक कर्ज देणार आणि राज्य सरकार या कर्जाबाबत हमी घेणार अशी ही योजना आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांच्या कारखान्यांचा या कर्ज योजनेत समावेश झाला आहे. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे यामध्ये नाव नाही, हे विशेष. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या कारखान्यांचा या योजनेत अंतर्भाव असून, यात एका कारखान्याला शंभर कोटींहून अधिक कर्जाचा समावेश आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने नुकतीच सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची प्राप्तिकर माफी देत अप्रत्यक्ष मदत केली आहे. नव्याने सरकारमध्ये आलेल्या राष्ट्रवादी नेत्यांच्या कारखान्यांनाही ही मदत झाली आहे. मात्र, यातही पंकजा मुंडेंच्या कारखान्याचे नाव नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंकजा मुंडेंच्या कारखान्याबाबत सकारात्मक असतात आणि त्या ज्यांना नेते मानतात त्याच अमित शाहांच्या कारखान्याकडून मात्र मदत मिळत नाही, यामागे नेमके काय असा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.